MS Dhoni Retirement: भारतीय क्रिकेट संघ आणि चेन्नईचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) निवृत्तीच्या चर्चांना जोर धरला आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनी स्नायू फाटल्याने (Muscle Tear) झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लंडनला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्जरी झाल्यानंतर प्रकृतीतील सुधारणांच्या आधारेच महेंद्रसिंग धोनी आपल्या भवितव्याचा निर्णय घेणार आहे. बंगळुरु (Bangalore) संघाने केलेल्या पराभवामुळे चेन्नई संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यापूर्वीच बाहेर पडला असून, पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. चेन्नई आणि बंगळुरु या दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो होता, ज्यामध्ये विराटच्या संघाने बाजी मारली.
चेन्नई संघ प्लेऑफमध्ये न पोहोचण्याची ही तिसरीच वेळ आहे. एम चिन्नास्वामी स्टेडिअममधील या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा 27 धावांनी पराभव केला. धोनीने या सामन्यात 13 चेंडूत 25 धावा केल्या. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. हा पराभव धोनीच्या इतक्या जिव्हारी लागला की, तो बंगळुरु संघाच्या खेळाडूंशी हात न मिळवताच ड्रेसिंग रुममध्ये परतला.
दरम्यान सूत्रांनी IANS ला दिलेल्या माहितीनुसार, धोनी लंडनमधील सर्जरीनंतर आपल्या निवृत्तीसंबंधीचा निर्णय घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "धोनी आयपीएलदरम्यान स्नायू फाटलेल्या दुखापतीमुळे त्रस्त होता. यामुळे सर्जरीसाठी तो लंडनला जाण्याची शक्यता आहे. तो पूर्णपणे फिट नाही, पण त्याची अजूनही क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. सर्जरीनंतर तो आपल्या निवृत्तीसंबंधी निर्णय घेणार आहे. कारण त्याला रिकव्हर होण्यासाठी 5 ते 6 महिने लागणार आहेत".
219 धावांचा पाठलाग करताना, खराब सुरुवातीपासून सावरल्यानंतर मधल्या षटकांमध्ये चेन्नई संघ गडबडला. रचिन रवींद्रच्या 61 धावा आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 42 धावांनीही संघ विजयी होऊ शकला नाही. लीग टप्प्यात बंगळुरुप्रमाणे 14 गुण असतानाही चेन्नई संघ नेट रन रेट कमी असल्याने बाहेर पडला.
चेन्नईच्या चाहत्यांना संघ स्पर्धेतून बाहेर पडण्यापेक्षाही महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) हा कदाचित अखेरचा सामना होता याचं जास्त वाईट वाटत आहे. पण धोनीने अद्याप संघ व्यवस्थापनाला निवृत्तीसंबंधी काहीच सांगितलं नसल्याची माहिती चेन्नईच्या अधिकाऱ्याने दिली आहे.