मुंबई : कायरन पोलार्ड याची वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी-२० कर्णधारपदी निवड झाली आहे. वर्ल्ड कपमधली खराब कामगिरी आणि त्यानंतर भारताविरुद्धच्या सीरिजमधल्या पराभवानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. याआधी जेसन होल्डर वेस्ट इंडिजच्या वनडे टीमचा आणि कार्लोस ब्रॅथवेट टी-२० टीमचा कर्णधार होता. तर जेसन होल्डर हा टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून कायम राहणार आहे.
पोलार्डला वनडे टीमचही नेतृत्व देण्यात आलं असलं तरी तो शेवटची वनडे ऑक्टोबर २०१६ साली खेळला होता. वेस्ट इंडिजच्या वनडे आणि टी-२० टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी पोलार्ड हा योग्य व्यक्ती असल्याचं वेस्ट इंडिज बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांनी सांगितलं.
कर्णधारपदी नियुक्ती केल्यामुळे पोलार्डने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत. खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत टीमला पुढे घेऊन जाण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, असं पोलार्ड म्हणाला.
नुकत्याच झालेल्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजची टीम नवव्या क्रमांकावर राहिली. वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजला ९ पैकी फक्त २ मॅच जिंकता आल्या.
२००७ वर्ल्ड कपमध्ये कायरन पोलार्डने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आत्तापर्यंत पोलार्ड १०१ वनडे मॅच खेळला आहे. पण पोलार्डची ओळख टी-२० क्रिकेटचा खेळाडू म्हणूनच आहे. पोलार्डने आत्तापर्यंत ४५१ टी-२० मॅच खेळल्या आहेत. २०१२ साली वेस्ट इंडिजने टी-२० वर्ल्ड कप जिंकला, या टीममध्येही पोलार्ड होता.
नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजपासून पोलार्ड वेस्ट इंडिजचा कर्णधार असेल.