मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेला इंग्लंडचा केव्हिन पिटरसन आता दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसू शकतो. नॅटवेस्ट टी20 ब्लास्टमध्ये इसेक्सकडून खेळणाऱ्या पिटरसननं यापुढे त्याचा मायदेश दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळण्याची शक्यता बोलून दाखवली आहे.
आता केव्हिन पिटरसनची इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाली नाही तर तो २०१९मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्यास पात्र ठरेल. त्यामुळे २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये पिटरसन दक्षिण आफ्रिेकेकडून खेळेल का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. केव्हिन पिटरसन सध्या ३७ वर्षांचा आहे. २०१९च्या वर्ल्ड कपवेळी तो ४० वर्षांचा असेल, त्यामुळे या वयात दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट बोर्ड पिटरसनला संधी देईल का हा प्रश्न आहे.
२०१३-१४मधल्या अॅशेस सीरिजवेळी झालेल्या वादानंतर पिटरसन इंग्लंडकडून खेळलेला नाही. यानंतर पिटरसन फक्त टी20 लीग क्रिकेटमध्ये दिसला. पिटरसननं इंग्लंडकडून १०४ टेस्ट मॅचमध्ये ४७.२०च्या सरासरीनं ८१८१ रन्स बनवल्या आहेत. पिटरसनचा टेस्टमधला सर्वाधिक स्कोअर २२७ रन्स आहे. तर टी20मध्ये पिटरसननं ३७ मॅचमध्ये ११७६ रन्स बनवल्या आहेत.