मुंबई : कोरोनाच्या विघ्नानंतर आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातील पहिले 3 सामने यशस्वीरित्या पूर्ण झाले. मंगळवारी 21 स्पटेंबरला (Rajsthan) राजस्थान विरुद्ध पंजाब (PBKS) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या रंगतदार झालेल्या सामन्यात राजस्थानने पंजाबचा 2 धावांनी पराभव केला. या सामन्यात जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली.
दोन्ही संघांकडून चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. या फटकेबाजीवरुन टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gaautam Gambhir) नियमात बदल करण्याबाबत प्रस्ताव केला आहे. हा प्रस्ताव बॅट्समनच्या बाजूने झुकणारा आहे. (IPL 2021 pbks vs rr commentator Gautam Gambhir Says If Batsman hit Shot 90 Miter So Should Be Given 8 Runs)
गंभीर काय म्हणाला?
बॅट्समनने मारलेला फटका सीमारेषेवरुन गेल्यास तो सिक्स ठरतो. त्यामुळे टीम आणि त्या बॅट्समनच्या खात्यात 6 धावा जोडल्या जातात. अनेक खेळाडू हे ताकदीने गगनचुंबी सिक्स मारतात. तुम्ही शॉट सिक्स मारा की गगनचुंबी धावा मिळतात त्या फक्त 6. यावरुन गंभीरने भाष्य केलंय.
एखादा फलंदाज जर 90 किंवा त्यापेक्षा अधिक मीटर लांबीचा फटका मारतो, तर त्याला 6 ऐवजी 8 धावा मिळायला हव्यात, असं गंभीरचं मत आहे. गंभीर स्टार स्पोर्ट्ससाठी राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यात सुरु असलेल्या सामन्यादरम्यान कमेंट्री करत होता. यावेळेस गंभीरने याबाबत मत मांडलं.
पंजाब विरुद्ध राजस्थान सामना सुरु होता. यावेळेस राजस्थानची बॅटिंग सुरु होती. लियाम लिविंगस्टोनने सामन्याच्या 12 व्या ओव्हरदरम्यान अर्शदीप सिंहच्या बोलिंगवर कचकचीत सिक्स मारला. यावरुन गंभीरने आपलं मत मांडलं.
टी 20 क्रिकेटमध्ये आणखी रोमांच निर्मितीसाठी असा बदल करायला हवा. तसेच या नव्या बदलाची अंमलबजावणी आयपीएलमधूनच करायला हवी, असंही गंभीरने ठासून सांगितलं. गंभीरने सांगितलेली बाब मनावर घेतल्यास निश्चितच उत्कंठा आणखी वाढेल, याबाबत अजिबात शंका नाही.
आकाश चोप्राचंही समर्थन
गंभीर समालोचन करत असताना त्याचा सहकारी आकाश चोप्राही (Aakash Chopra) उपस्थित होता. आकाशनेही गंभीरच्या या सल्ल्यावर सहमती दर्शवली. नक्कीच असं व्हायला हवं. कारण 90 मीटरचा फटका मारण्यासाठी ताकद आणि कौशल्याचा कस लागतो. फलंदाजाला जोर लावावा लागतो. त्यामुळे त्याचं योग्य ते बक्षिस मिळायला हवं, असं आकाश चोप्राने नमूद केलं.
"त्यानंतरही आव्हान कायम राहिल"
आकाश चोप्राने सहमती दर्शवल्यानंतर गंभीरने यावर पुन्हा भाष्य केलं. "जर असं झालं तर क्रिकेटमधील रोमांचं आणखी वाढेल. एखाद्या संघाला विजयासाठी 1 चेंडूत 8 धावांची आवश्यकता असेल, तेव्हाही तो संघ सामन्यात कायम राहिल. कोणत्याही फलंदाजाने 90 किंवा त्यापेक्षा अधिक मीटर लांबीचा फटका मारला तर सामना विजयासह संपेल," असंही गंभीरने सांगितलं.