मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट मॅच बुधवार २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या मॅचआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीनं टीमच्या बॅटिंगबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारताचे बॉलर चांगली बॉलिंग करत आहेत. आता बॅट्समनना त्यांची साथ देऊन चांगली कामगिरी करावी लागणार आहे, असं विराट म्हणाला. पर्थ टेस्टमध्ये भारताच्या बॅट्समननी चांगली बॅटिंग केली नव्हती. या मॅचमध्ये विराटनं शानदार शतक केलं होतं. तर ऍडलेडच्या पहिल्या टेस्टमध्ये पुजारानं शतक झळकावलं होतं. पुजाराच्या शतकामुळे पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला होता.
आत्तापर्यंत झालेल्या दोन्ही टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या ४० विकेट घेतल्या आहेत. आता बॅट्समननी जबाबदारीची जाणीव ठेवून खेळावं. आमचे बॉलर शानदार बॉलिंग करत आहेत. अन्यथा आम्ही जो स्कोअर बनवत आहोत त्यावर बॉलर काहीच करू शकत नाहीत, असं विराट म्हणाला. पर्थ टेस्टमध्ये झालेल्या पराभवाचा तिसऱ्या मॅचमधल्या आमच्या कामगिरीवर कोणताही फरक पडणार नाही, असं विराटनं सांगितलं.
४ टेस्ट मॅचच्या या सीरिजची पहिली टेस्ट मॅच भारतानं ३१ रननी जिंकली. तर दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला १४६ रननी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ही सीरिज आता १-१नं बरोबरीत आहे. तिसरी टेस्ट जी टीम जिंकेल ती ही सीरिज गमावू शकत नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी भारतीय टीममध्ये बदल करण्यात आले आहेत. सतत अपयशी ठरत असलेल्या मुरली विजय आणि केएल राहुल यांना या मॅचमधून डच्चू देण्यात आला आहे. या दोघांऐवजी टीममध्ये मयंक अग्रवाल आणि रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे.