Manoj Tiwary on Gautam Gambhir: माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने (Manoj Tiwary) आपला सहकारी खेळाडू आणि भारतीय संघाचा सध्याचा प्रशिक्षक गौतम गंभीरसंबंधी (Gautam Gambhir) मोठा खुलासा केला आहे. गंभीरने एका सामन्यादरम्यान मैदानातच आपल्याला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या होत्या असं त्याने सांगितलं आहे. मनोज तिवारीने भारतीय संघाकडून 12 कसोटी आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मनोज तिवारीने गौतम गंभीरबद्दल सांगितलं.
गौतम गंभीरसह नेमकं काय प्रकरण आहे? असं विचारण्यात आलं असत मनोज तिवारी म्हणाला की, "नवा मुलगा येतो, तेव्हा त्याला लाइमलाईट दिली जाते. वृत्तपत्रात थोडी जागा मिळते. हे कारण असू शकतं. ज्यामुळे तो कदाचित संतापत असेल".
मनोज तिवारीची पीआर टीम गौतम गंभीरच्या पीआर टीमवर भारी पडली का? असं विचारण्यात आलं असता त्याने सांगितलं की, "जर माझी पीआर टीम असती तर आजच्या तारखेला मी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झालो असतो". पुढे तो म्हणाला की, "ऑस्ट्रेलियाविरोधातील एका सामन्यात मी सर्वाधिक धावा केल्या होत्या. मी 129 धावा कुटल्या होत्या. त्याने (गंभीर) 105 का 110 धावा केल्या होत्या. माझी धावसंख्या सर्वाधिक होती. पण तरीही त्या सामन्यात एक दिवस तो भडकला. तू काय करतोयस, खाली चल, सगळे गेलेत असं म्हणाला".
"मी वॉशरुममध्ये होतो. तो (गंभीर) मागून आला आणि पुन्हा एकदा भडकू लागला. असा अॅटीट्यूड चालणार नाही. मी तुला खेळवणारच नाही. मी म्हटलं, गौती भाई काय बोलताय. वसीम भाई (वसीम अक्रम) आले आणि त्यांनी प्रकरण शांत केलं. त्यादिवशी हाणामारी झाली असती," असंही त्याने सांगितलं.
24 ऑक्टोबर 2015 ला काय झालं होतं? या प्रश्नावर मनोज तिवारीने सांगितलं की, "तो रणजी सामना खेळत होता. मी आपला गार्ड (पिचवर सेट होणं) घेत होतो. तो स्लिपवर होता. तिथेत तो सुरु झाला आणि शिव्या देऊ लागला. अशा शिव्या की तुम्ही त्या बोलूही शकत नाही. हो, आई-बहिणीच्या शिव्या. शिव्या देता देता तू संध्याकाळी भेट तुला मारतो असं म्हणत होता. मी म्हटलं संध्याकाळी कशाला, आताच मार. ये, होऊन जाऊ दे".