एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जाणारा पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हे नाव आता हळूहळू धुसर होऊ लागलं आहे. 2018 चा अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आपल्या करिअरमधील सर्वात खडतर प्रवास सध्या करत आहे. एकीकडे रणजी संघातून त्याला वगळण्यात आलेलं असताना, दुसरीकडे आयपीएल मेगा लिलावात एकाही संघाने त्याला विकत घेतलेलं नाही. फॉर्मशी झगडत असणाऱ्या पृथ्वी शॉला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं असून, इतर कोणताही संघ त्याला खेळवण्यास इच्छुक नाही. याच गोष्टीमुळे त्याने भारतीय संघातील आपलं स्थानही गमावलं आहे. आयपीएलने त्यात आता आणखी भर टाकली आहे. लिलावात दोन वेळा त्याचं नाव येऊनही आणि 75 लाखांची बेस प्राईस असतानाही कोणीही त्याच्यावर पैसे गुंतवले नाहीत. 2018 मध्ये पृथ्वी शॉने आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदाच असं झालं आहे.
पृथ्वी शॉ फक्त आपला फॉर्मच नाही, तर वागणूक आणि फिटनेसमुळेही चाहते आणि समीक्षकांच्या निशाण्यावर असतो. दरम्यान आता माजी भारतीय निवडकर्त्याने पृथ्वी शॉमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याचं सांगत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
"पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघात होता. दिल्लीत संघात असतानाच त्याला राहुल द्रविड, रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली यांच्याशी संवाद साधण्याची संधी होती. राहुल द्रविड तर त्याचा अंडर 19 संघाचा प्रशिक्षकही होता," असं निवड समितीतील माजी सदस्याने पीटीआयशी संवाद साधताना सांगितलं.
"सचिन तेंडुलकरने त्याची चर्चा केली होती हे तर मुंबई क्रिकेटमध्ये जगजाहीर आहे. हे महान खेळाडू मूर्ख आहेत का? तुम्हाला त्याच्यात काही बदल दिसतोय का? जरी तो झाला असेल तरी तो दिसत नाही," असाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
आयपीएल 2025 च्या लिलावात कोणीही पृथ्वी शॉला आपल्या संघात घेण्यास उत्सुक नव्हतं. पृथ्वी शॉकडून ज्या अपेक्षा होत्या त्या तुलनेत त्याचं करिअर अगदी उलट्या दिशेने जात आहे. आपल्याकडे कौशल्य असतानाही पृथ्वी मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेताना आणि मैदानात ते दाखवण्यात कमी पडत आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की, धारणा प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करते आणि शॉच्या बाबतीत, कोणत्याही बाजूने सकारात्मक काहीही येताना दिसत नाही. अगदी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी परत बोलावण्यापूर्वी अनफिट असल्यामुळे रणजी संघातून वगळले.