विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आहे. विराट कोहलीबरोबर (Virat Kohli) खेळायला मिळणं हे प्रत्येक भारतीय युवा क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की इंडियन प्रीमिअर लीग (IPL) असो विराट कोहलीच्या फलंदाजीवर चाहते प्रभावित असतात. पण तुम्हाला माहित आहे का? देशाच्या राजकारणातील एक बडा नेता चक्क विराट कोहलीबरोबर क्रिकेट खेळलाय इतकंच नाही, तर तो राजकीय नेता विराट कोहलीचा कर्णधारही होता.
कोण आहे तो राजकीय नेता?
बिहारच्या राजकारणात पाऊल ठेवण्याआधी माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांचा लहान मुलगा तेजस्वी यादवला (Tejashwi Yadav) क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द करायची होती. काही वर्ष तेजस्वी प्रोफेशनल क्रिकेटही खेळलाय. आधी दिल्ली संघाकडून खेळणारा तेजस्वी यादव नंतर झारखंड संघाकडून खेळत होता. 2010 मध्ये त्याने क्रिकेट कारकिर्दिला अलविदा केला.
विराट कोहलीशी कनेक्शन
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यात एक असं कनेक्शन आहे, जे फारच कमी लोकांना माहित आहे. या कनेक्शनची माहिती स्वत: तेजस्वी यादवने केला आहे. राजकारणात पाऊल ठेवण्याआधी तेजस्वी यादव क्रिकेटर होते. इतकंच नाही तर आयपीएलमध्येही ते खेळले आहेत. क्रिकेट कारकिर्दीत विराट कोहली खेळत असलेल्या संघाचंही तेजस्वी यादव यांनी नेतृत्व केलं आहे.
तेजस्वी यादव यांचे वडिल आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव ज्यावेळी केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते, त्याच वेळी तेजस्वीच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. तेजस्वीने दिल्ली क्रिकेटमध्ये एन्ट्री केली. 2008 म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामात तेजस्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघातून खेळला. पण 2010 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला.
विराटच्या संघाचं नेतृत्व दिल्ली क्रिकेट संघातून खेळताना तेजस्वीने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. दिल्ली अंडर-15 आणि अंडर-19 संघातून तेजस्वी आणि विराट एकत्र खेळले आहेत. यावेळी तेजस्वीने संघाचं नेतृत्व केलं होतं. या संघातून विराट कोहलीही खेळला होता. तेजस्वीने दहा वर्षांपूर्वीचा विराट कोहलीबरोबरच एक फोटोही सोशल मीडियावर ट्विट केला आहे.
यामुळे क्रिकेटला अलिवदा
दिल्ली क्रिकेटनंतर तेजस्वी यादव झारखंड क्रिकेट संघातून खेळले. झारखंड क्रिकेट संघासाठी तेजस्वी एकूण सात सामने खेळले. पण या दरम्यान त्यांच्या दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाल्याने क्रिकेटला अलविदा करावा लागल्याचं तेजस्वी यादव यांनी सांगितलं. 2010 मध्ये तेजस्वी यादव आपला शेवटाच सामना खेळले.
क्रिकेटला अलविदा केल्यानंतर तेजस्वी यादव यांनी राजकारणात प्रवेश केला. वडिला लालू प्रसाद आणि आई राबडी देवी यांच्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वात मोठे नेते म्हणून तेजस्वी यादव उदयास आले. बिहारचे सर्वात युवा उपमुख्यमंत्री आणि विधानसभेत सर्वात युवा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केलं.