England vs Australia Ashes Series 2023: अॅशेस सीरिजमधील (Ashes Series 2023) दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडचा (England) पराभव केला आहे. दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या या सामन्यातील जॉनी बेअरस्टोच्या विकेटमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी घेतलेल्या या विकेटवरुन अनेक माजी क्रिकेटरही नाराजी व्यक्त करत असून आपली मतं मांडत आहे. बॉल डेड आहे असं वाटल्याने जॉनी बेअरस्टो क्रीझमधून पुढे गेला असता ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर अॅलेक्सने त्याला धावबाद केलं. जॉनी बेअरस्टोला ओव्हर संपली असं वाटलं होतं. पण त्याने क्रीझ सोडताच ऑस्ट्रेलियाच्या विकेटकिपरने फायदा घेतला आणि चेंडू स्टंपवर फेकला.
जॉनी बेअरस्टोला नियमाप्रमाणे बाद केलं असलं तरी अनेकांनी हे खेळभावनेच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळवृत्तीवर तसंच ज्या प्रकारे विकेट घेण्यात आली त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान, या विटेकचा मोठा फटका इंग्लंड संघाला बसला. बेन स्टोक्सने जबरदस्त शतक ठोकल्यानंतरही इंग्लंड सामन्यात पुनरागमन करु शकला नाही. 371 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ 327 वर सर्वबाद झाला.
जॉनी बेअरस्टोच्या विकेटनंतर मैदानात उपस्थित प्रेक्षकांनीही नाराजी जाहीर करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चिडके म्हणून चिडवलं. दरम्यान, या निर्णयाचा विरोध करणाऱ्यांना भारतीय संघाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने सुनावलं आहे. त्याने ट्वीट करत म्हटलं आहे की, "हे स्लेजर्स....खेळभावनेचं लॉजिक फक्त भारतीयांना लागू होतं का?".
Hey sledgers….does spirit of the game logic apply to u or is it just for Indians?
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 2, 2023
गंभीरच्या या ट्विटमागे भारत आणि इंग्लंड यांच्यातील 2011 च्या नॉटिंगहॅम कसोटीदरम्यान घडलेल्या एका घटनेचा संदर्भ आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बेलने चेंडू टोलवल्यानंतर चौकार गेला आहे असे समजून क्रीज सोडली होती. मात्र, चेंडूने सीमेवरील दोरीला स्पर्श केला नव्हता. यानंतर प्रवीण कुमारने चेंडू उचलला आणि धोनीकडे फेकला. परिणामी बेल क्रीजच्या बाहेर असल्याने धावबाद झाला.
Excellent work by Alex Carey to run out Jonny Bairstow.
Terrific presence of mind there! pic.twitter.com/0hrfGstX65
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 2, 2023
2011 मधील या घटनेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भारतीय संघ ड्रेसिंग रुमकडे जात असताना प्रेक्षकांनी आवाज करत आपली नाराजी दर्शवली होती. पण जेव्हा पुन्हा खेळ सुरु कऱण्यात आला तेव्हा बेल मैदानात पुन्हा फलंदाजीसाठी येताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. धोनीने आपली अपील मागे घेतल्याने तो मैदानात परतल्याचं कळताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या होत्या.
त्यावेळी भारत गतविजेता होता. भारताने तीन महिन्यांपूर्वी श्रीलंकेचा पराभव करत 2011 चा विश्वचषक जिंकला होता. सचिन तेंडुलकरने धोनीला अपील मागे घेण्यास तयार केलं होतं.
इंग्लंड आणि वाद हे समीकरण तसं नवं नाही. 2019 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बेन स्टोक्सने डाईव्ह टाकल्यानंतर चेंडू त्याच्या बॅटला लागून चौकार गेला होता. तसंच स्टुअर्ट ब्रॉडने 2013 च्या ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झेल गेल्यानंतरही मैदान सोडलं नव्हतं.