पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये यंदा अनेक वाद पाहायला मिळाले ज्यात अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलीफ हिचा सुद्धा समावेश होता. खलीफने बॉक्सिंगमध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचा प्रवास सोपा नव्हता, कारण तिला प्रत्येक सामन्यानंतर तिच्या लैंगिककतेबाबत प्रश्न विचारले जात होते.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खलिफला तिच्या लैंगिकतेबद्दल प्रश्न विचारले जात होते. मात्र तिने याचा तिच्या परफॉर्मन्सवर प्रभाव पडू दिला नाही आणि सुवर्ण पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक संपल्यावरही इमाने खलीफच्या लैंगिकतेबाबत वाद अजूनही सुरु आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने सुद्धा यावादावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये सुरु असलेल्या लैंगिकतेच्या वादावर तापसी पन्नूने बोलताना सांगितले की, 'जर एखाद्या खेळाडूचा जन्म जास्त टेस्टोस्टेरोन सोबत झाला असेल तर त्यात यात खेळाडूची काही चूक नाही'.
इमाने खलिफबाबत काय म्हणाली तापसी?
अभिनेत्री तापसी पन्नूने सांगितले की, "मी स्वतः या विषयावर आधारित चित्रपटामध्ये प्रमुख नायिकेची भूमिका निभावली होती. तो चित्रपट एका महिला खेळाडूबाबत होता जिला जास्त टेस्टोस्टेरोनमुळे बॅन करण्यात आलं होतं". तापसी पन्नूने 'रश्मी रॉकेट' यानावाचा एक चित्रपट बनवला होता ज्यात एक महिला धावपटू नॅशनल लेव्हलची खेळाडू होते. ती देशासाठी पदक जिंकते परंतु तरीही तिला जेंडर टेस्टसाठी बोलावले जाते.
हेही वाचा : IPL 2025: पंजाब किंग्सचं स्वप्न भंगलं, दिग्गज खेळाडूला नाही बनवू शकले कोच, LSG साठी आनंदाची बातमी
तापसीने म्हंटले की, "हा चित्रपटात मी एका महिला खेळाडूची भूमिका निभावली होती. तुमचे हार्मोन्स काय हे तुमच्या नियंत्रणात नसते. असं नाही की तुम्ही काही सप्लिमेंट्स घेतलेत किंवा कोणतं हार्मोन इंजेक्ट केलं आहे. तुम्ही फक्त त्या हार्मोन सोबत जन्मता. आमच्या चित्रपटातील युक्तिवाद असा होता की असे बरेच खेळाडू आहेत जे इतरांपेक्षा जैविक फायदा घेऊन जन्माला येतात. जसे हुसेन बोल्ट आणि मायकेल फेल्प्स. हे सर्व लोक इतरांच्या तुलनेत विशिष्ट जैविक वाढ घेऊन जन्माला आले आहेत. मग अशांवर का बंदी घालण्यात येत नाही?
तापसी म्हणाली की, "केवळ त्यांच्यावरच का बॅन लावला जातो ज्यांच्याकडे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त असते? जर एखाद्याने या विशिष्ट स्पर्धेसाठी इंजेक्शन घेतले असेल तर ते नक्कीच बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर बंदी घातली पाहिजे. पण जर त्याने ते घेतले नाही तर आणि तरी त्याच्यात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढले तर ते त्याच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टीमुळे आहे. हे समजून घेतले पाहिजे" .