नवी दिल्ली : करिअरच्या वाटा निवडल्यानंतर त्या वाटांवर चालताना अनेकाना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणजे एक प्रकारची अडथळा शर्यतच पार करावी लागते. पण जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर मात्र परिस्थिती बदलू शकते हेच सिद्ध करुन दाखवलं आहे एका महिला कुस्तीपटूने.
कौटुंबीक हिंसेचा सामना केल्यानंतरही खचून न जाता आपल्या यशानेच पतीला चपराक मारणाऱ्या या महिला कुस्तीपटूचं नाव आहे, गुरशरणप्रीत कौर. वयाच्या ३७व्या वर्षी, कुस्तीच्या खेळात जवळपास आठ वर्षांनंतर पुनरागमन करत पदक मिळवण्याची किमया केली आहे. आशियाई कुस्ती स्पर्धा २०२० या जागतिक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत गुरशरणने ३७ किले वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. हे पदक मिळवत तिने एक इतिहासच रचला आहे.
गुरशरणचा हा विजय अनेक महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. तिने खासगी जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना केला आहे. २०१३मध्ये लग्नबंधनात अडकल्यानंतर तिने अनेक कठिण प्रसंगांना तोंड दिलं. मुलांसमवेत कुस्तीचा सराव करण्यास तिच्या पतीचा विरोध होता. जेव्हा जेव्हा गुरशरण मुलांसोबत कुस्तीचा सवाल करत असे तेव्हा प्रत्येक वेळी पती तिला मारहाण करत असे. अखेर तिने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अनेक चढउतार पाहिल्यानंतर पंजाबच्या तरणतारण येथील गुरशरण हिने कुस्तीच्या क्षेत्रात पुनरागमन करणं कठीण असल्याचंही सांगितलं.
आईने सांभाळलं....
२०१८मध्ये अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या गुरशरणने आठ वर्षांनंतर कुस्तीच्या सरावाची सुरुवात केली. यादरम्यानच तिच्या आईने गुरशरणच्या चार वर्षांच्या मुलीचा सांभाळ केला. त्यामुळे आपल्याला मिळालेलं हे यश आणि हे पदक आईला समर्पित केल्याचं तिने सांगितलं.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
आशियाई स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या गुरशरणचं आणखी एक स्वप्न आहे. ते म्हणजे ऑलिम्पिक पदक विजयाचं. ज्यासाठी बुधवारी लखनऊ येथे होणाऱ्या ट्रायल सामन्यात तिने जिंकणं अपेक्षित आहे. कुस्तीच्या खेळात आता कुठे पाय रोवू पाहणाऱ्या गुरशरणला यशाची चाहूल लागली आहे. पण, खासगी आयुष्यातील प्रसंगांवर मात करत ज्या प्रकारे यशाची वाट तिने निव़डली ही बाब प्रशंसनीयच आहे.