Kalki Avatar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशच्या कल्की धाम मंदिराचे (Kalki Dham) भूमिपूजन केलं. त्यावेळी बोलताना मोदींनी भगवान कल्किवर भाष्य केलं. 10 अवतारांच्या माध्यमातून केवळ मानवच नाही तर दैवी अवतारही आपल्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या रूपात मांडले गेले आहेत, असं मोदी म्हणाले. भगवान कल्किबद्दल तुम्ही 'असूर' या वेब सिरीजमध्ये देखील ऐकलंय. मात्र, भगवान कल्कि आहेत तरी कोण? कलियुगातील अवताराची भविष्यवाणी आहे तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
भगवान कल्कि कोण आहे?
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढतं, तेव्हा देवता मानवी अवतारात जन्म घेतात, अशी मान्यता आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे, त्यापैकी आतापर्यंत पृथ्वीवर ९ अवतार जन्माला आले आहेत आणि दहावा अवतार लवकर पृथ्वीवर अवतार घेईल, अशी मान्यता आहे. भगवान विष्णू 10 व्या अवतारात कल्कीच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेणार असून त्यांच्या जन्माबाबत धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
मत्स्य पुराणात भगवान विष्णू 10 व्या अवतारात कल्किचा जन्म होईल, असा उल्लेख केला गेला आहे. मत्स्य पुराणानुसार, कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात भगवान कल्की पृथ्वीवर जन्म घेणार आहे. कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुग सुरू होण्यापूर्वी म्हणजेच दोन्ही युगांच्या संगमावर भगवान कल्किचा जन्म सावन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी होईल, अशी देखील धार्मिक मान्यता आहे.
तुमच्या माहितीसाठी, कलियुग 4 लाख 32 हजार वर्षे टिकेल. सध्या कलियुगाचा प्राथमिक टप्पा सुरू आहे, त्यापैकी कलियुगाची 5126 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि 426875 वर्षे बाकी आहेत. भगवान कल्कि एक महान योद्धा असेल, जो कलियुगाच्या शेवटी वाईट गोष्टींचा विनाश करेल, असं मत्सय पुराणात म्हटलं गेलंय. कल्की 64 कलांनी परिपूर्ण असेल आणि हातात धनुष्य बाण घेऊन पृथ्वीवर धर्माची स्थापना करेल, असं देखील म्हटलं गेलंय.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)