स्ट्रॉबेरीला हवामानाचा फटका, यंदा दुपटीने महाग झाली स्ट्रॉबेरी; 1 किलोचे दर पाहा!

Strawberry Price Hike: लांबलेला पाऊस आणि हवामान बदलाचा फटका स्ट्रॉबेरी उत्पादनावर झाला असून स्ट्रॉबेरी दुपट्टीने महागली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 15, 2024, 09:29 AM IST
स्ट्रॉबेरीला हवामानाचा फटका, यंदा दुपटीने महाग झाली स्ट्रॉबेरी; 1 किलोचे दर पाहा! title=
Strawberry Prices Soar in Pune Amid Weather Challenges

Strawberry Price Hike: लालचुटुक आणि आंबट गोड स्ट्रॉबेरी सगळ्यांनाच प्रिय आहे. महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पिक घेतले जाते. महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी क्रीम आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम हे खूप प्रसिद्ध आहे. मात्र, यंदा स्ट्रॉबेरी महाग झाली आहे. ऐरवी 200 रुपये किलोने मिळणारी स्ट्रॉबेरी आता 500 रुपये किलोवर पोहोचली आहे. यंदा स्ट्रॉबेरी दुपटीने महाग झाली आहे. 

लांबलेला पाऊस आणि हवामान बदलाचा फटका स्ट्रॉबेरी उत्पादनावर झाला आहे. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरीला देशभरातून मागणी असते. मात्र, यंदा स्ट्रॉबेरीची आवक कमी झाल्याने स्ट्रॉबेरीचा दर हा दुपट्टीने वाढला आहे. त्यामुळं ऐन नाताळात स्ट्रॉबेरी महागणार आहे. तसंच, स्टॉबेरीमुळं बनवलेल्या उत्पादनांच्या किंमतीतदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. 

पुण्यातील फळबाजारात एक किलो स्ट्रॉबेरीला 250 ते 500 रुपये किलो असा दर मिळत आहे. मागील वर्षी याच स्ट्रॉबेरीचा भाव एक किलोला 200 ते 250 रुपये इतका होता. मात्र, यंदा लांबलेला पाऊस आणि हवामान बदलामुळं स्ट्रॉबेरी महाग झाली आहे. 

लाल कांद्याची आवक वाढल्याने बाजारभावात घसरण

देशांतर्गतील बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची मोठी आवक येत असल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत शनिवारी जास्तीत जास्त बाजारभावात पंधराशे रुपयांची तर सरासरी बाजारभावात एक हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील तसेच अहिल्यानगर, पुणे, चाकण, सोलापूर, यासह देशांतर्गत असलेल्या बाजार समितीमध्ये मागणीच्या तुलनेत नव्याने येत असलेल्या लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्यामुळे गुरुवारच्या तुलनेत आज शनिवारी दोन दिवसात टप्प्याटप्प्याने जास्तीत जास्त बाजार भाव पंधराशे रुपये तर सरासरी बाजारभाव एक हजार रुपयांची घसरण झाली.