पुणे: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या अॅड. संजय पुनाळेकर यांना शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन दिला.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मे महिन्यात संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली होती. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर दोघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश रेट्टे यांनी पुनाळेकर आणि भावे यांच्या कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ केली होती. ही मुदत संपल्यानंतर त्यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर केला.
मात्र, न्यायालयाने संजीव पुनाळेकर यांना दररोज सीबीआयच्या कार्यालयात हजर राहण्याची अट घातली आहे. तसेच त्यांना देश सोडून जाण्यासही मनाई करण्यात आली आहे.
Advocate Sanjeev Punalekar, an accused in Narendra Dabholkar murder case, has been granted bail by Pune sessions court on a surety amount of Rs 30,000
— ANI (@ANI) July 5, 2019
संजीव पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांचे खटले लढवले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या शरद कळसकरच्या माहितीवरून पुनाळेकर यांना अटक करण्यात आली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप पुनाळेकर यांच्यावर आहे. दाभोलकरांच्या हत्येसाठी जी बंदूक वापरली ती नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर यांनी दिल्याची माहिती शरद कळसकर याने सीबीआयला दिली होती.