मुंबई : तुमच्याकडे गाडी आहे का? त्या गाडीच्या विम्याचा हप्ता दरवर्षी भरण्याचा तुम्हाला त्रास होतो का? तर आता तो त्रास वाचण्याची शक्यता आहे. कारण, आता दुचाकीप्रमाणेच गाडीच्या विम्याचा हप्ताही दर तीन वर्षांनी भरणं शक्य होणार आहे.
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) अशाप्रकारची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे दरवर्षी वाढणाऱ्या विम्याच्या हप्त्यातूनही ग्राहकांची सुटका होणार आहे.
'इरडा'ने २०१४ सालीच दुचाकी वाहनांसोबत तीन वर्षांच्या विमा हप्त्याची परवानगी ऑटोमोबाईल कंपन्यांना दिली होती. त्याला आलेला प्रतिसाद अतिशय चांगला होता. त्याच आधारावर आता चार चाकी वाहनांनाही ही सुविधा दिली जाणार आहे.
सध्या गाड्यांच्या विम्याचा हप्ता दरवर्षी भरावा लागतो. दरवर्षी विम्याच्या हप्त्यात १५ ते ४० टक्क्यांची वाढ होते. त्यामुळे गाडीचा विमा दरवर्षी महाग होत जातो. आता या त्रासातून ग्राहकांची सुटका होण्याची आशा आहे.