मुंबई : रिलायन्स जिओनं फ्री कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेटची ऑफर दिली आहे, पण मुकेश अंबानींच्या रिलायन्सला जिओमधून नफा कमवायचा असेल तर त्यांना कमीत कमी 7.5 ते 8 कोटी ग्राहक मिळवावे लागणार आहेत.
या ऑफरमुळे पुढच्या दोन-तीन वर्ष रिलायन्सला तोटा होईल, पण 180 रुपये महिन्याला खर्च करणारे 7.5-8 कोटी ग्राहक मिळाल्यानंतर रिलायन्स नफ्यामध्ये येऊ शकते. या ऑफरमुळे जियो मार्केटमधल्या इतर कंपन्यांचा हिस्साही रिलायन्सला मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतभरात 10 कोटी ग्राहक बनवण्याचं आमचं लक्ष्य असल्याचं याआधीच मुकेश अंबानींनी स्पष्ट केलं आहे. मुकेश अंबानींनी हे लक्ष्य पूर्ण केलं तर रिलायन्स जिओला मोठा फायदा होऊ शकतो.
तर गोल्डमॅन या संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार रिलायन्सला 7.5 ते 8 कोटी ग्राहक बनवून फायद्यामध्ये येण्यासाठी 2019-20 साल उजाडेल. सध्या भारतामध्ये महिन्याला सरासरी 600-900 एमबी इंटरनेट डेटा वापरला जातो. रिलायन्स जिओमुळे इंटरनेट डेटा जास्त प्रमाणात वापरला जाईल, यामुळेही नफा वाढू शकतो.