www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई
तुमच्यासाठी एक खूश खबर आहे. बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बॅंकेत नव्याने ३० टक्के नोकर भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या शाखांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शाखांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे.
अनेक बॅंकांनी आपला विस्तार वाढविण्यासाठी भर दिला आहे. यासाठी बँकांनी विस्तार योजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत बँका नव्या शाखा उघडणार आहेत. त्यामुळे नव्याने नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या वर्षी सुमारे ८० हजार नव्या नोकऱ्या या क्षेत्रात निर्माण होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २५ ते ३० टक्क्यांनी अधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी मोठय़ा प्रमाणावर विस्तार योजना हाती घेतल्या आहेत. त्याचा परिणाम असणार आहे.
रिझर्व्ह बँकेने नव्या बँकांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. अनेक कंपन्या बँका सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. कंपन्यांनी परवान्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज सादर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत कंपन्यांना बँका चालविण्याचे परवाने दिले जातील, असे रिझर्व्ह बँकेकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे.
भारत सरकारने बँकिंग क्षेत्राच्या विस्ताराची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत बँकांनी आपापल्या योजना आखल्या आहेत. ग्रामीण भागात आजही बँकिंग सेवा पोहोचलेली नाही. त्यामुळे तेथे गुंतवणुकीचा अभाव दिसून येते. ग्रामीण भागात बँका पोहोचल्यास, अब्जावधी रुपयांचे भांडवल बँकांमध्ये जमा होईल.
आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरण्यात येणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेने यंदा ५ हजार ते ६ हजार कर्मचाऱ्यांची नवी भरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. तर विस्तार योजना आणि सेवानवृत्ती यामुळे यंदा आयसीआयसीआयला ५ ते ६ हजार नवे कर्मचारी घ्यावे लागणार आहेत.
आयडीबीआय बँकेत २,२०० जागा भरावयाच्या असून देशातील दुसरी मोठी बँक आयडीबीआयने देशभरात ३००नव्या शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही २,००० ते २,२०० नवीन कर्मचारी भरावे लागणार आहेत. त्यामुळे बॅंकेमध्ये नोकरीची संधी चालून येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.