www.24taas.com, नवी दिल्ली
नोकियाचा नवा स्मार्टफोन ल्यूमिया आता ल्यूमिया ५१० च्या नव्या रुपात आणखी काही वैशिष्ट्यांसह बाजारात दाखल झालाय. नवी दिल्लीमध्ये नोकियानं ‘ल्यूमिया ५१०’चं लॉन्चिंग केलं. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी, आपल्या या नव्या फोनच्या उद्घाटनासाठी भारताची निवड केलीय. भारतानंतरच हा फोन जगभरातील विविध देशांत लॉन्च केला जाईल.
‘ल्यूमिया ५१०’ हा स्मार्टफोन खास युवा वर्गाला समोर धरून बनवण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलंय. ल्यूमिया सिरीजमध्ये कंपनीनं आत्तापर्यंत चार फोन बाजारात आणलेत. नोकिया स्मार्टफोनचे भारत प्रमुख विपूल मेहरोत्रा यांच्या म्हणण्यानुसार, ‘ल्यूमिया ५१० ची किंमत ११,००० रुपयांच्यापेक्षाही कमी असेल. कंपनीनं या स्मार्टफोनच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची हयगय न करता सर्वोत्कृष्ठ स्मार्टफोन ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा ध्यास घेतलाय.’
ल्यूमिया हा विंडोजवर आधारित असलेला स्मार्टफोन आहे. यामध्ये पाच मेगापिक्सल कॅमेरा, चार गेगाबाईट इनबिल्ट मेमरी, नोकिया ड्राईव्ह, नोकिया ट्रान्सपोर्टसहित अनेक सुविधा देण्यात आल्यात.
भारतात ऐन दिवाळी तोंडावर आली असताना नोकियानं हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. भारतातलं सणांचं महत्त्व ओळखून कंपनीनं हा निर्णय घेतलाय. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ल्यूमिया ५१० संपूर्ण भारतात उपलब्ध करण्यात येईल, असं मेहरोत्रा यांनी म्हटलंय.