www.24taas.com, मुंबई
जवळपास २० वर्षांनी १९९३ बॉ़म्बस्फोट खटल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. इतर आरोपींप्रमाणेच अभिनेता संजय दत्तलाही पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. त्यामुळे आता बॉलिवूड निर्मात्यांचे धाबे दणाणलेत. कारण २०१३ ते २०१५ यावर्षापर्यंत संजूबाबाच्या नावावर जवळपास १० फिल्मस होत्या.
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या निकालात मुन्नाभाई संजय दत्तचं काय होणार? याकडं संजूबाबाच्या फॅन्सप्रमाणेच बॉलिवूडच्याही नजरा लागल्या होत्या. कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यापैकी संजूबाबानं १८ महिन्यांची शिक्षा आधीच भोगलीय. त्यामुळे आता उर्ववरीत साडे तीन वर्षांची शिक्षा संजयला भोगावीच लागणारेय. या निर्णयामुळे बॉलिवूडचे निर्माते चांगलेच हादरलेत. सध्या संजूबाबाच्या नावावर जवळपास १० फिल्म्स आहेत. त्यापैकी राज कुमार हिरानीची `पी.के.` ही फिल्म जवळपास ५० टक्के पूर्ण झालीय. `पोलिसगिरी` ही फिल्म जवळपास ८० टक्के पूर्ण झालीय तर करण जोहर होम प्रॉडक्शनची ‘उंगली’ ही फिल्म फक्त ३० टक्केच पूर्ण झालीय तसंच जंजीरचंही शुटिंग सुरु झाल्याची चर्चा होती. हे चार सिनेमे मिळून जवळपास ७० ते ८० कोटी रुपयांचं नुकसान बॉलिवूड निर्मात्यांना सहन करावं लागणार आहे. इतकंच नाही तर त्याच्या नावावर असणाऱ्या एकूण १० सिनेमांचं मिळून जवळपास २५० कोटी रुपये संजय दत्तवर लागले आहेत.
संजयच्या या आहेत १० फिल्मस्, ज्यांचं भवितव्य आहे धोक्यात
पीके – २०१३
जंजीर – २०१३
अलिबाग – २०१३
पोलिस गिरी – २०१३
मिस्टर फ्रॉड – २०१३
जान की बाझी – २०१३
पॉवर – २०१३
जब जब फूल्स मिले – २०१३
मुन्नाभाई – २०१४
चमको चमेली – २०१५
नुकतीच संजय दत्तनं आपली सिनेनिर्मिती संस्थाही स्थापन केली होती. या शिक्षेमुळे त्या निर्मिती संस्थेचं पुढे काय हाही प्रश्नच आहे. नुकताच रिलज झालेल्या जिला गाझियाबाद या सिनेमात संजय दत्तचं दर्शन घडलं होतं. आता पुन्हा संजूबाबा बिग स्क्रीनवर कधी दिसेल असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय. मात्र, त्याचं उत्तर संजूबाबाकडेही नाही... एकूणच संजय दत्तने केल्याला कृत्याचं प्रायश्चित्य तो भोगतोच आहे. मात्र, त्याच्यामुळे बॉलिवूडलाही शिक्षेला सामोरं जावं लागतंय... नाही का!