कैलास पुरी, www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
सध्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्यानं चर्चेत येतायत. मात्र ज्या महिला या अत्याचाराला वाचा फोडून लढण्यासाठी समोर येतात. त्यांना मात्र समाजाचा आणि कुटुंबीयांकडून मिळणारी वेगळी वागणूक त्रासदायक ठरते. पिंपरी-चिंचवडमधल्या एका विवाहितेवर बलात्कार झाल्यानंतर तिच्या पतीनं मात्र तिला भक्कम आधार दिलाय. ही आहे या दोघांची दुर्देवी आणि अनोखी कहाणी...
चाकणमध्ये राहणारी विवाहित तरुणी काही दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणं भाजी खरेदीसाठी बाजारात गेली. परतत असताना तिला तिच्या मैत्रिणीनं गाडीत लिफ्ट दिली. विश्वासान ती गाडीत बसली. पण इथंच तिच्या विश्वासाला तडा गेला. गाडीत असलेल्या मैत्रिणीच्या चुलत भावानं तिच्यावर अमानुष बलात्कार केला. त्यावेळी तिचा चार महिन्याचा गर्भ मृत झाला आणि तिचा पायही मोडला.
एवढा मोठा आघात झाला असतानाही ती आता भक्कमपणे उभी राहिली आहे. ते केवळ पतीच्या पाठबळामुळं. पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. लवकरच नव्यानं आयुष्य सुरु करण्याचा निर्धार तिनं केलाय. पतीनंही कुणी काहीही म्हटलं तरी त्यांचा विचार न करता तिची साथ देण्याचा निर्धार केलाय.
आरोपींना कडक शिक्षा व्हावी एवढीच या दोघांची इच्छा आहे. चाकण पोलिसांनी आरोपींना अटक केलीय. त्याना शिक्षा होईलही. पण आज अत्याचार झालेल्या मुलीला समाजाकडून वेगळी वागणूक दिली जाते. प्रसंगी घरचे लोकही या समाचाचा भाग होऊन जातात. पण ही मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि ती बदलत आहे. या पती-पत्नींनं केलेली ही छोटीशी सुरुवात आहे. आता जबाबदारी आहे ती आपली. या बदलण्याच्या प्रवाहात सामील होण्याची....