मंगेशकरांनाही मोदींची भुरळ!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी स्वतःभोवती निर्माण केलेल्या वलयाची मोहिनी चक्क लतादिदी आणि मंगेशकर कुटुंबियांवरही पडलीय. दिनानाथ मंगेशकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मोदी शुक्रवारी पुण्यात येणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 31, 2013, 07:02 PM IST

www.24Taas.com, झी मीडिया, पुणे
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी स्वतःभोवती निर्माण केलेल्या वलयाची मोहिनी चक्क लतादिदी आणि मंगेशकर कुटुंबियांवरही पडलीय. दिनानाथ मंगेशकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मोदी शुक्रवारी पुण्यात येणार आहेत. यानिमित्ताने पुण्यामध्येही `नमो नमः`चा जोरदार गजर होणार असून, या इवेन्ट मॅनेजमेंटची जय्यत तयारी भाजपने सुरू केलीय.
लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा हा `मोदी मॅनिया` वाढतच चाललाय... आणि हा मॅनिया आपोआप वाढत नाहीय, त्यासाठी मोदी आणि त्यांची खास टीम नियोजनपूर्वक हे सगळं घडवून आणतंय. आता पुण्यामध्येही मोदींच्या स्वागत सभेची अशीच जय्यत तयारी सुरूय. कारण दिनानाथ मंगेशकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यासाठी मोदी पुण्यात येतंय...
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं उद्घाटनाचा कार्यक्रम खरे तर बिगरराजकीय आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. खरे पाहता भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कुठल्याही मान्यवराला या कार्यक्रमासाठी बोलावणे लतादीदींना अवघड नव्हतं. प्रत्यक्षात त्यांनी नरेंद्र मोदींना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलं. लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबियांवरही मोदींची मोहिनी पडलीय, हेच खरं… स्वतःची प्रतिमा उजळवण्यासाठी अशी संधी दवडतील, तर ते मोदी कसले…
दिवंगत मोहन धारिया यांच्या वनराईच्या कार्यक्रमाला वर्षभरापूर्वी मोदींनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या नूतनीकृत एम्फी थियेटरचं उद्घाटन केलं होतं. त्याच दौ-यात साधू वासवानी मिशनच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. आता मोदी पुन्हा एकदा पुण्यात येतायत... मोदी सध्या जातील तिथे भाजपची आणि पर्यायाने स्वतःची ताकद वाढवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करतायत. केवळ मोदींच्या दर्शनानं भाजप कार्यकर्ते तसेच चाहते उल्हासित होत आहेत… यामुळे विचारी समाजाच्या मानसिकतेतही चलबिचल घडून येत आहे… मोदींनाही नेमकं तेच हवंय…
मोदींच्याच भाषेत सांगायचे तर , ` मित्रहो ही काही साधी सरळ गोष्ट नाही…` समाजातील इंटेलेक्च्युअल विंगच्या मानसिकतेत बदल घडवून आणणे हे मोदी समोरचं मोठं आव्हान आहे. प्रामुख्याने हा वर्गच या चौफेर उधळलेल्या वारूच्या राजकीय महत्वाकांक्षेत अडथळा ठरत आलाय. मोदी या सगळ्यांची पद्धतशीर सोय लावत असल्याचं आज चित्र आहे. त्यामुळे या कार्यक्रमबाजीचा खरा लाभार्थी कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही…

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.