www.24taas.com, झी मीडिया, मनमाड
मनमाड शहरातील मुलींचं वसतिगृह असलेल्या मनोरम सदन इथून गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या अपहरणाचा
प्रकार चर्चेचा विषय बनलेला असताना, पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली अहे.
जवळपास शंभर वर्षांहून अधिक काळापासून मनमाडमध्ये मनोरमा सदन हे महिला वसतिगृह कार्यरत आहे.
पुर्नवसनासाठी इथं दाखल करण्यात आलेल्या 16 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याचा प्रकार संस्था अधिक्षकेच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. संस्थेच्या अनिल भाऊराव शेजवळ या शिपायानंच एका महिलेच्या मदतीनं विद्यार्थिनीला पळवून नेलं. अपहरणात सहकार्य केलेल्या रोहित भालचंद्र जगताप या तरूणालाही
पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या अल्पवयीन मुलीला संस्थेच्या माजी प्रभारी अधिक्षिका रेचल शेलार यांच्या सांगण्यावरून बाहेर नेण्यात आल्याचं समोर आलंय. याआधीही शेलार यांच्यावर एका मुलीवर बलात्कार करण्यात सहकार्य केल्याबद्दल नाशिक इथल्या गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसंच या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संस्थेच्या बडतर्फ अधिक्षिका सुमन रणदिवे आणि उज्वल नागरिक या तीन महिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.