मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी जितकी चुरस आहे तेवढीच महापालिकेतील पदांवर नेमणुकांबाबतही पक्षांतर्गत आहे.
दोन्ही पक्षांमध्ये नगरसेवकांच्या संख्याबळात फार फरक नसल्यामुळे सभागृह आणि विविध समित्यांचे कामकाज चालवताना पक्षाच्या महापालिका नेत्यांची कसोटी असणार आहे. त्यामुळे अनुभवी, हुशार आणि आक्रमक अशा निकषांवर सर्वगुण संपन्न नगरसेवकांची महापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती सदस्य पदावर वर्णी लावली जाईल हे स्पष्ट आहे.
अगदी कट टू कट संख्याबळ असल्यामुळे शिवसेनेत विविध पदांवर पुन्हा पुरुषप्रधान वर्चस्व पाहायला मिळू शकते.
महापौर पदासाठी शिवसेनेत स्पर्धेत यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर यांची नावे आघाडीवर आहेत. तर महिलांमध्ये विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव यांची नावे चर्चेत आहेत.
यशवंत जाधव आणि मंगेश सातमकर अनुभवी आहेत, तसेच याआधी त्यांना महापौर पदी हुलकावणी मिळाली आहे.
आशिष चेंबूरकर वरळीतून निवडून आलेत. याआधी स्नेहल आंबेकर याच परिसरातून निवडून आल्याने पुन्हा इथूनच महापौर द्यावा याबाबत पक्षात खल होऊ शकेल.
स्थायी समिती ही महापालिकेची अत्यंत महत्वाची आणि आर्थिक नाडी असलेली समिती असल्याने तिथेही शिवसेनेला तोडीस तोड अध्यक्ष द्यावा लागेल. तिथेही अनुभव महत्वाचा असेल.
यापूर्वी स्थायी शिवसेनेच्या ताब्यात असताना महिलेची वर्णी लागलेली नाही. त्यात यंदाही बदलाची शक्यता कमी आहे. त्यामुळे यशवंत जाधव किंवा मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर यांचीच नावे चर्चेत आहेत. रमेश कोरगावकर यांना गेल्यावेळी या पदासाठी हुलकावणी मिळालीय, त्यामुळे त्यांचाही या पदासाठी दावा मानला जातोय.
सभागृह नेताही अनुभवी आणि आक्रमक गुणांचा आवश्यक असणार आहे.
शिवसेनेत इथेही महापौर पदासाठी चर्चेत असलेल्यापैकी कुणा एकाची वर्णी लागू शकते. या स्पर्धेत अत्यंत आक्रमक स्वभाव आणि अनुभवी राजुल पटेल यांचा समावेश होऊ शकतो.