दृष्टी मिळाली पण भविष्यात मात्र अंधार...

मुंब्र्याच्या लकी कंपाऊंड दुर्घटनेत १८ तासानंतर बचावलेल्या संध्या ठाकूर या चिमुरडीला पुन्हा एकदा दृष्टी मिळालीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 17, 2013, 09:30 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंब्र्याच्या लकी कंपाऊंड दुर्घटनेत १८ तासानंतर बचावलेल्या संध्या ठाकूर या चिमुरडीला पुन्हा एकदा दृष्टी मिळालीय. मुंबईच्या सायन रूग्णालयात उपचारानंतर संध्याला दृष्टी मिळालीय. मात्र, संध्या ठाकूरचं पालकत्व घेण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याने संध्याला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी सायन रूग्णालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय.
अवघ्या सहा वर्षांची संध्या ठाकूर... लकी कंपाऊंडमधल्या दुर्घटनेत १८ तास मृत्यूशी झुंज देऊन संध्या आश्चर्यकारकरित्या बचावली होती. मात्र, मृत्यूच्या दाढेतून बचावलेल्या संध्याला डोळे उघडल्यावर दिसला तो फक्त अंधार... या दुर्घटनेत तिच्या डोळ्यात प्रचंड माती गेल्यानं तिला काहीही दिसत नव्हतं. त्यातच या दुर्घटनेत ती तिच्या आई, वडील आणि भावापासून दुरावली. अद्यापही तिचे कुटुंबिय कुठे आहेत? याची तिला माहिती नाही. पण सायन रुग्णालयात दहा दिवस उपचार झाल्यानंतर आता संध्याच्या डोळ्यांना नवी दृष्टी मिळालीय. सायन रूग्णालयाच्या यशस्वी प्रयत्नाचे मुंबईच्या महापौरांनी कौतुक केलंय.

संध्याच्या डोळ्यांपुढचा अंधार नष्ट झाला असला तरी तिच्या भविष्यात सध्या तरी अंधारच आहे. संध्याचं पालकत्व घेण्यास कोणीच पुढे येत नसल्यानं तिला अनाथ आश्रमात टाकण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सायन रूग्णालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय. ठाणे जिल्हाअधिकारी आणि ठाणे पालिकेनं जबाबदारी घेतली नाही तर मुंबई महापालिका जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं मुंबईच्या महापौरांनी सांगितलंय.
संध्याच्या पालकत्वासाठी मुंबईतल्या अनेक संस्था आणि व्यक्ती पुढे आल्या आहेत. मात्र, कायदेशीर जाचक अटींमुळे संध्याला तीन महिन्यानंतर अनाथ आश्रमात पाठवावं लागणार आहे.