आठवलेंना कुणी घर देता का घर...

भाजपाची केंद्रात सत्ता स्थापन होऊन 15 महिने, तर राज्यात सत्ता येऊन नऊ महिने झाले आहेत. या कालावधीत भाजपाच्या मित्रपक्षांच्या पदरात काय पडलं असा प्रश्न मित्रपक्षांचे नेते उपस्थित करतायत.

Updated: Aug 3, 2015, 09:21 PM IST
आठवलेंना कुणी घर देता का घर... title=
RAMDAS ATHAWALE

दीपक भातुसे, झी मीडिया मुंबई : भाजपाची केंद्रात सत्ता स्थापन होऊन 15 महिने, तर राज्यात सत्ता येऊन नऊ महिने झाले आहेत. या कालावधीत भाजपाच्या मित्रपक्षांच्या पदरात काय पडलं असा प्रश्न मित्रपक्षांचे नेते उपस्थित करतायत.

केंद्रात मंत्रिपदाची स्वप्न पाहणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांच्या पदरी मंत्रीपद तर दूरच पण साधा खासदारांसाठी असलेला दिल्लीतील बंगलाही मिळालेला नाही. आठवलेंची आजही दिल्लीतील घरासाठी घरघर सुरू आहे.

एक अकेला इस शहरमें …रामदास आठवलेंची अवस्था या गाण्यातल्या ओळींप्रमाणं झालीय. आठवले विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची साथ सोडून भाजपाच्या गोटात सामील झाले. हे करताना भाजपाने आठवलेंसह त्यांच्याबरोबर आलेल्या मित्रपक्षांना सत्तेत वाटा, मंत्रीपद, महामंडळे देण्याचे आश्वासन दिले. मात्र केंद्रातील 15 महिन्यांच्या सरकारच्या काळात आठवलेंच्या पदरी अद्याप मंत्रीपद पडलेले नाही. काही दिवसांपूर्वी आठवलेंनी नरेंद्र मोदींची भेट घेऊन मंत्रीपदाच्या आश्वासनाची पुन्हा आठवण करून दिली.

मंत्रीपदासाठी आठवले एकीकडे धावपळ करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची125 वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीतही आठवलेंना स्थान दिलेले नाही. हे कमी म्हणून की काय केंद्रात सत्ता येऊन 15 महिने झाले तरी आठवलेंना अद्याप दिल्लीत बंगलाही मिळालेला नाही. यापूर्वी खासदार म्हणून आठवलेंनी दिल्लीतील बंगला मुदतीत सोडला नाही म्हणून काँग्रेस सरकारने त्यांचे बंगल्यातील सामान बाहेर काढले होते.

आता भाजपाबरोबर गेलेले आठवलेंना दिल्लीतील घरासाठी किती घर घर करावी लागली, किती उंबरठे झिजवावे लागले ते त्यांच्याच तोंडून ऐका..

मंत्रीपद आणि घरासाठी वारंवार दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेणाऱ्या आठवलेंच्या पदरी अद्याप काहीही पडलेले नाही.

रामदास आठवले यांच्याप्रमाणेच राजू शेट्टी, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांचीही तिच अवस्था आहे. भाजपाच्या मित्रपक्षांचे हे नेते आपल्या पदरात सत्तेचा वाटा कधी पडेल, याची वाट पाहतायत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.