www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
टेक्सटाइल्स इंडस्ट्रीतील सियाराम सिल्क मिल्सचे संचालक अभिषेक पोद्दार यांच्या पत्नी आणि विहारी ज्वेल्सच्या सर्वेसर्वा विहारी शेठ यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. विहारी यांना अंतर्वस्त्रांमध्ये लपवून २.५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची तस्करी केल्याच्या धक्कादायक प्रकरणी अटक करण्यात आली. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.
डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सच्या अधिका-यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विहारी शेठ यांना पकडले. अटकेनंतर विहारी यांनी आपण दहा वेळा महागड्या दागिन्यांची तस्करी केल्याचे कबूल केले.
विहारी यांचे सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विहारी ज्वेल्स नावाचे महागड्या दागिन्यांचे दुकान आहे. याच दुकानासाठी तस्करी करत असल्याचे विहारी शेठ यांनी कबूल केले. विहारी यांनी माहिती देताच महसूल संचालनालयाच्या अधिका-यांनी विहारी ज्वेल्स या दुकानाला सील लावले असून सर्व व्यवहार तपासण्यास सुरुवात केली आहे.
विहारी ज्वेल्समधून आतापर्यंत चार कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. विदेशातून आणलेल्या या दागिन्यांची भारतात अधिकृत नोंद नाही. या दागिन्यांवर लागू असलेला कर भरण्यात आलेला नाही, असे प्राथमिक तपासात आढळल्यामुळेच कारवाई करण्यात आल्याची माहिती महसूल संचालनालयाने दिली.
सिंगापूरहून मुंबईला येत असलेल्या एस. क्यू. ४२६ या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानातून एक महिला तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्यामुळे महसूल संचालनालयाने विमानतळावर कडक तपासणी सुरू केली होती. या तपासणी दरम्यान तस्करी करताना विहारी शेठ यांना पकडण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.