मुंबई : महाराष्ट्रात सरकारमध्ये सन्मानजक स्थान दिलं तरच शिवसेना केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमाला उपस्थित राहील, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. भाजपबरोबर सेनाही अधिक आक्रमक झाली आहे.
राज्यमंत्रीमंडळात शिवसेनेला सन्मानजनक स्थान हवं अन्यथा उद्या होणा-या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधीत अनिल देसाई शपथ घेणार नाहीत अशी भूमीका शिवसेनेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. उद्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होतोय. शिवसेनेच्यावाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. शिवसेनेकडून अनिल देसाईंच्या नावाची शिफारस करण्यात आलीये. मात्र राज्याच्या मंत्रीमंडळात शिवसेनेनं सन्मानजनक स्थान मिळावं अशी मागणी शिवसेनेनं केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपकडून शिसेनेशी संपर्क करण्यात आला आहे. शिवसेनेने सुरेश प्रभूंचे नाव द्यावे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मात्र, खासदार अनिल देसाई यांच्या नावाला शिवसेनेने पसंती दिली आहे. प्रभूंचे नाव मागे पडले आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते यांना डावलले जात आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे दिसत आहे.
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे सुरेश प्रभू यांना मोदी सरकारमध्ये अत्यंत जबाबदारीचे असे रेल्वेमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. प्रभू यांना आपल्या कोट्यातून मंत्रिपद देण्यास शिवसेनेचा विरोध असला तरी त्यांची वर्णी लावण्याचा निर्धार पंतप्रधान दी यांनी केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उद्या रविवारी होणार आहे. या विस्तारात अनेक नव्या नेत्यांना संधी मिळणार असून त्यात प्रभू यांच्या नावाचा समावेश आहे. निवडणूक प्रचारादरम्यान विकासाची अनेक मोठमोठी आश्वासने देणाऱ्या मोदी यांच्यावर आता आश्वासनपूर्तीची जबाबदारी येऊन पडली आहे. या आश्वासनपूर्तीमध्ये रेल्वे आणि पायाभूत सुविधांची भूमिका कळीची राहणार आहे. त्यामुळे या खात्यांसाठी मोदी यांनी ताकदीच्या माणसांचा शोध केला. त्यांनी अधिकची पसंती ही प्रभू यांच्या नावावर दिलेय.
शिवसेनेच्या दोघांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शब्द देताना सुरेश प्रभू यांच्या नावासाठी मोदींनी आग्रह धरला आहे. मात्र, प्रभू हे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेशी संबंधित असले तरी सध्या ते पक्षात सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद देण्यास उद्धव ठाकरे यांचा विरोध आहे. शिवाय आधी राज्यातील सत्ता वाटपाचे ठरवा, मग केंद्रातील बघू, असा पवित्राही सेनेने घेतला आहे.
सुरेश प्रभू यांना रेल्वे मंत्रिपद देण्याचा निर्णय झाल्यास सध्याचे रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या अन्य महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. प्रभू यांच्यासाठी रेल्वेसह अन्य काही छोट्या खात्यांचा समावेश करून पायाभूत सुविधा हे नवे खाते निर्माण करण्याचा पंतप्रधानांचा मानस असल्याचे समजते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.