www.24taas.com, मुंबई
कबीर कलामंचाचे शितल साठे आणि सचिन माळी या कलाकारांनी आज विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केलं. या दोघांवरही नक्षलवादी असल्याचा आरोप होता. नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या आरोपांवरून पोलीस त्यांच्या मागावर होते.
शितल साठे आणि सचिन माळी.... कबीर कलामंचचे दोघे कलाकार..... दलित, वंचित, शोषितांच्या व्य़था, त्यांचे प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे लोकांसमोर मांडतायत. भांडवलदारांविरोधात आवाज उठवणा-या या दोघांनाही विद्रोही प्रवाह जवळचा वाटला. सरकारनं या दोघांनाही नक्षलवादी ठऱवलं आणि तसे आरोपही त्यांच्यावर लावले. गेली चार वर्षं एटीएस त्यांच्या मागावर होतं. अखेर दोघांनीही विधानभवन परिसरात आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.
सचिन माळी यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून एमए केलंय. तर सध्या ते पुणे विद्यापीठात एम.फिल करतायत. तर शीतल साठे यांनीही समाजशास्त्रात एम.ए केलंय. काही वर्षांपूर्वी आनंद पटवर्धन यांनी तयार केलेल्या जयभीम कॉम्रेड या डॉक्युमेंट्रीमध्येही या दोघांच्या कार्याचा गौरव केला होता. विशेष म्हणजे या डॉक्युमेंट्रीला राज्य सरकारचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार मिळाला होता.
गिरीश कर्नाड, रत्ना पाठक, प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो या सगळ्या मंडळींचा सचिन माळी आणि शीतल साठे या दोघांनाही पाठिंबा आहे.... आता सरकार या दोघांसंदर्भात काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.