www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या काही वर्ष रखडलेल्या पेडर रोडवरील उड्डाणपुलाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय अखेर झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं अर्थात MSRDC ने यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरु केल्याचं समजतं आहे. लता मंगेशकर आणि आशा भोसले अशा दिग्गजांच्या विरोधामुळे या उड्डाणपूलाबाबत निर्णय होत नव्हता.
मंगेशकर कुटुंबिय राहत असलेल्या इमारतीसमोरुनच हा पुल प्रस्तावित आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोड आणि हाजी अली या भागात दररोज होणारी वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पेडर रोडवर उड्डाणपूल बांधण्याचा तोडगा तब्बल १० वर्षांपूर्वी सुचवण्यात आला होता. मात्र लता मंगेशकर यांच्या 'प्रभुकुंज' या निवासस्थानासमोरुन जाणाऱ्या या प्रस्तावित उड्डाणपुलाला तेथील रहिवाशांनी विरोध केला होता.
उच्चभ्रू वस्तीतून जाणाऱ्या या उड्डाणपुलामुळे इमारतीची शोभा जाते, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली होती. मंगेशकर भगिनींनी तर या उड्डाणपुलाच्या विरोधात तत्कालीन मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती.