अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: भारतीय लष्कराचं देशवासियांच्या मनातलं स्थान हे नेहमीच वरचं राहिलंय. जवानांचा त्याग, देशसेवेची त्यांची निष्ठा याचं आदरयुक्त कौतूक भारतीयांना आहे... शत्रूची कधीच गय न करणारे जवान अडचणीच्या प्रसंगीही धावून जातात... वायूदलाच्या एका छोट्याशा कृतीनं हेच पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.
२६ जुलैच्या मध्यरात्री भारतीय वायूसेनेचं सुखोई थर्डी MKI फ्लँकर हे विमान अफाट वेगानं दिल्लीकडे निघालं होतं... पुण्याहून रात्री ११.२०च्या सुमारास या विमानानं उड्डाण केलं आणि अफाट वेगात अवघ्या ४० मिनिटांत ते दिल्लीला पोहोचलं.
अशी काय अर्जन्सी होती? काय घडलं होतं दिल्लीत...?
एरवी शत्रूचा वेध घेण्यासाठी आतूर असलेलं हे फायटर जेट यावेळी मात्र दिल्लीकडे झेपावलं होतं ते दोघांना जीवदान देण्यासाठी... त्याचं घडलं असं की,
पुण्यात १८ तारखेला ललिता सरवदे यांचा अपघात झाला... त्यांच्या मेंदूला मार लागला होता... २६ तारखेला आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टरांनी त्यांना ब्रेन-डेड घोषित केलं. लष्करी जवान असलेल्या त्यांचा मुलगा गणेश यांनी आपल्या आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
तिकडे दूर दिल्लीमध्ये लष्करी रुग्णालयात दोन रुग्णांना यकृत आणि किडनीची गरज होती... ललितांचे अवयव त्यांना दिले जाऊ शकत होते, पण घाई करणं गरजेचं होतं... मग तातडीनं सूत्रं हालली...
पुण्यात वाहतूक पोलिसांनी हॉस्पिटलपासून ते विमानतळापर्यंत ग्रीन-कॉरिडॉर तयार केला... रस्ता मोकळा केला गेला...
अवघ्या ८ मिनिटांमध्ये ललिता सरवदेंचं यकृत आणि किडनी विमानतळावर पोहोचली... तिथं वायूदलाचं फ्लँकर जेट तयार ठेवण्यात आलं होतं... तातडीनं विमानानं उड्डाण भरलं आणि अवघ्या ४० मिनिटांमध्ये ते दिल्लीत पोहोचलं.
सीमेचं रक्षण असो की पूर... अतिरेकी हल्ला असो की भूकंप... देशवासियांच्या सेवेत भारतीय लष्कर कधीच कमी पडत नाही... एक लिव्हर आणि एका किडनीच्या पुणे-दिल्ली सुपरफास्ट डिलिव्हरीनं भारतीय लष्कराच्या शिरपेचात आणखी एक 'सेवेचा तुरा' खोवला आहे, हेच या घटनेनं अधोरेखित केलं.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.