पुणे : ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालंय. यावेळी, शरद पवारांनी आपल्या भाषणात साहित्यिकांची समिती नेमून साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड करावी, असा सल्ला आपल्या भाषणात दिलाय.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबद्दल बोलताना साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेचा फेरविचार करा, या निवडणूक प्रक्रियेसाठी नवी पद्धत अवलंबणं आवश्यक आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांच्या समितीकडून नव्या अध्यक्षांची निवड करता येईल, असा सल्ला पवारांनी दिलाय.
यावेळी, स्टेजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, पालक मंत्री गिरीश बापट ,गुलजार नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष डॉ.पी.डी.पाटील, माधवी वैद्य, मावळते अध्यक्ष सदानंद मोरे उपस्थित होते.
सलग चौथ्यांदा साहित्य संमेलनासाठी आपण उपस्थित असल्याचंही यावेळी पवारांनी आवर्जुन नमूद केलं. माझी राजकीय आणि सामाजिक कारकिर्द पिंपरीमध्येच बहरली... देशाच्या लोकसभेमध्ये पिंपरने मला 6 वेळा पाठविण्याचा विक्रम केला, अशी आठवणही त्यांनी सांगितली.