पुणे : नाशिकच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीनंतर आज पुण्यातही मराठा बांधवांनी मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.
डेक्कन जिमखाना येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सकाळी साडेदहाच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, संत कबीर चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. या मोर्चातही तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
अनेक नेतमंडळींही या मोर्चात सहभागी झालेत. नाशिकच्या मोर्चात सहभागी झालेल्या उदयनराजे भोसलेंनी पुण्यातही उपस्थिती लावली. त्यांच्यासह ऑलिम्पिकची धावपटू ललिताबाबर ही देखील या मोर्चात सहभागी झाली.
मराठा क्रांती मोर्चांच्या नियोजनासाठी पुण्यात वॉर रूम उभारण्यात आली आहे. या वॉर रूम मधून राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांचे नियोजन करण्यात येत आहे.चारशे स्वयंसेवक वॉर रूम मध्ये कार्यरत आहेत.
स्वतंत्र आयटी सेलही कार्यरत आहे. वॉर रूम मध्ये महिला आणि युवतींचाही मोठा सहभाग आहे. मोर्चांचे काटेकोर नियोजन वॉर रूम मधून होतेय. पुण्यातील मोर्चासाठी सात हजार स्वयंसेवक आहेत. पार्किंगसाठी ८० ग्राऊंड आहेत.