पुणे : वाढती महागाई आणि गगणाला भिडलेले डाळीचे भाव. याविरोधात राष्ट्रवादीने गांधीगिरी केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन केले. अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांना महापौरांकडून डाळीचं गिफ्ट देण्यात आले. कारण किरकोळ बाजारात अजूनही डाळींचे दर चढेच आहेत.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना दिवाळी भेट म्हणून डाळींचा बॉक्स भेट देण्यात आला. एरवी कुठल्याही आंदोलनाच्या वेळी दिसणारी आक्रमकता याठिकाणी नसली तरी परस्परांनी काढलेल्या चिमट्यांचा फराळ मजेशीर आणि तितकाच खरपूस होता.
डाळ भेट देताना झालेला संवाद.
मिसेस बापट : थोडी जास्त आणायची.
काकडे : परवडत नाही.
बापट: एक वेळचं वरण झालं असतं
याला म्हणतात अस्सल पुणेरी. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी काकडे महापौरांना घेऊन बापटांच्या घरी पोहोचले. दिवाळीच्या कोरड्या शुभेच्छा देतील ते काकडे कसले. सदाशिव पेठेतील काकडेंनी कसब्यातल्या बापटांना चक्क मौल्यवान डाळींचा एक अख्खा बॉक्स भेट दिला.
महागाईची झळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या घरापर्यंत पोहोचलीय. डाळ १०० रुपये किलोने देणार असं परवाच ते म्हणाले होते. आजही त्यांच्याकडे आश्वासनाशिवाय दुसरं काहीच नाही. बाजारात मोठ्या प्रमाणावर डाळ येणार असली तरी ती १०० रुपयांनी उपलब्ध करून देण्याचा ठोस फॉर्म्युला काय, ते मंत्री महोदयांनी सांगितलेला नाही.
भाजप-राष्ट्रवादीच्या डाळ- खिचडीला उकळी येणार असेल तर happy diwali म्हणण्याशिवाय पर्याय नाही. आंदोलन झालं, दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आणि अखेर बापट वहिनींनी तयार केलेल्या स्वादिष्ट अशा दिवाळी फराळाचा आस्वाद सर्वांनी घेतलाच.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.