पत्नीच्या हत्या करून पती फरार; प्रियकराचा घेतोय शोध

उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एकानं आपल्या पत्नीची चाकूनं हल्ला करत हत्या केलीय. हत्येनंतर फरार झालेल्या या व्यक्तीनं जाण्यापूर्वी भिंतीवर ‘अगर मैं बच गया तो अब दुसरे की बारी हैं’ असं लिहून ठेवलंय. 

Updated: Aug 12, 2014, 02:18 PM IST
पत्नीच्या हत्या करून पती फरार; प्रियकराचा घेतोय शोध title=
प्रातिनिधिक फोटो

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या एकानं आपल्या पत्नीची चाकूनं हल्ला करत हत्या केलीय. हत्येनंतर फरार झालेल्या या व्यक्तीनं जाण्यापूर्वी भिंतीवर ‘अगर मैं बच गया तो अब दुसरे की बारी हैं’ असं लिहून ठेवलंय. 

उल्हासनगरच्या पवन धाम अपार्टमेंटच्या कॅम्प नंबर 3 मध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय ध्यानचंद नारायण मेघनानी यानं आपल्या 30 वर्षीय पत्नी कविताची चाकूनं क्रूर हत्या केलीय. उल्हासनगरच्या सेन्ट्रल पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आलीय. पोलीस मात्र आता ‘त्या’ दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात आहेत, ज्याची हत्या करणार असल्याचं ध्यानचंदनं भिंतीवर लिहून ठेवलंय.  

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या वेळी कविताची पाच वर्षांची मुलगी घरात झोपली होती. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा तिनं आपल्या आईला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेलं पाहिलं. कविताच्या गुप्तांगावर चाकून अनेक वार करून ध्यानचंद फरार झाला होता. घराचा दरवाजा बंद असल्यानं भेदरलेल्या मुलीनं आपल्या आजीला या घटनेची माहिती दिली. 

त्यानंतर ध्यानचंदचा भाऊ किशोर मेघनानी पोलिसांना घेऊन घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना घरात कविताचं मृत शरीर आढळलं. यावेळी, पोलिसांनी भिंतीवर ‘अगर मैं बच गया तो अब दुसरे की बारी हैं’ असा संदेश लिहिलेलाही आढळला. 

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेजारच्यांशी संवाद साधल्यानंतर कविताचं दुसऱ्या पुरुषासोबत अफेअर सुरु होतं. त्यामुळे, मेघनानीचा पत्नीच्या प्रियकराला ठार करण्याचा बेत असावा असं दिसतंय. ध्यानचंद मेघनानी सध्या फरार आहे

कविताचं मृत शरीर पोस्टमॉर्टेमसाठी सेंट्रल हॉस्पीटलला पाठवण्यात आलंय. ध्यानचंद मेघनानी एक ट्रॅव्हल एजन्सी चालवत होता. आपल्या व्यवसायात त्याला बराच तोटाही सहन करावा लागला होता. तो कर्जात बुडालेला होता. आणखी एक हत्या होण्यापासून रोखण्यासाठी पोलीस मेघनानीच्या मित्रांची चौकशी करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.