यातना सहन करणारा 'नटसम्राट' एकटाच नाही...

सध्या गाजत असलेला नटसम्राट हा चित्रपट पाहिल्यावर कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. वुद्ध आई-वडिलांची होणारी हेळसांड या चित्रपटात दाखवण्यात आलीय. अशाच यातना भोगणाऱ्या अकोल्यातल्या वृद्ध दाम्पत्याला मात्र कायद्याचा आधार घेऊन न्याय मिळाल्याची घटना घडलीय.

Updated: Jan 9, 2016, 12:45 PM IST
यातना सहन करणारा 'नटसम्राट' एकटाच नाही...

जयेश जगड, अकोला : सध्या गाजत असलेला नटसम्राट हा चित्रपट पाहिल्यावर कोणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. वुद्ध आई-वडिलांची होणारी हेळसांड या चित्रपटात दाखवण्यात आलीय. अशाच यातना भोगणाऱ्या अकोल्यातल्या वृद्ध दाम्पत्याला मात्र कायद्याचा आधार घेऊन न्याय मिळाल्याची घटना घडलीय.

अकोला जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या जगतराव आणि वेणूताई बाजड आणि त्यांची ५० वर्षांची गतिमंद मुलगी यांचं स्वत: घर नसल्यामुळे आणि एकुलता एक मुलगा सांभाळ करत नसल्यामुळे चांगलीच ससेहोलपट होतं आहे. जगतराव बाजड १९९० मध्ये पोलाद कारखान्यातून अधिकारीपदावरून सेवानिवृत्त झाले होते. 

निर्णय चुकला... 

सेवानिवृत्तीनंतर मिळालेला पैसा आणि आपलं भिलाई इथलं घर त्यांनी मुलानं मोठ घर घ्यावं यासाठी विकलं. मुलाच्या आयुष्यात आनंद पेरणारा त्यांचा हाच निर्णय नेमका चुकला.

जगतराव यांना अरुण हा एकुलता एक मुलगा आहे आणि पाच मुली आहेत. त्यातील चार मुलींचे त्यांनी विवाह लावले. तर एक गतिमंद मुलगी त्यांच्याबरोबर राहते. या तिघांनी मुलगा अरुण आणि सुनेचा त्रास २०१० पर्यंत कसातरी सहन केला. अखेर २०१० ला या तिघांनी हा त्रास अतिशय असह्य होत असल्याने भिलाई सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते अकोला जिल्ह्यातील वेणूताई यांचं माहेर असलेल्या गोरेगाव इथं नातेवाईकांच्या मदतीनं राहायला आले.

ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा

अखेर या वृद्ध आई-वडिलांना काद्याचा आधार घ्यावा लागला. अकोल्यातील उपविभागीय दंडाधिका-यांनी अरुण बाजड यांना आपल्या वृद्ध आई-वडिलांना महिन्याकाठी निर्वाह भत्ता म्हणून साडे सात हजार रुपये देण्याचा आदेश दिले आहेत. २००७ ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा नुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी हे आदेश दिलेत.

एक नातू डॉक्टर, तर दुसरा इंजिनिअर

विशेष म्हणजे, अरुण बाजड यांचा एक मुलगा डॉक्टर तर एक इंजिनियर आहे तरीही अरुण हे आपल्या आई-वडिलांना केवळ १५०० रुपये एवढा तुटपुंजा भत्ता देत होते. ही कहाणी ऐकल्यावर संस्कारांशिवाय बुद्धिमत्ता आणि शिक्षणाला काहीही अर्थ नाही असंच म्हणावं लागेल.