Italian PM Giorgia Meloni Mention PM Modi: इटलीच्या पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'फ्रेण्ड' असा उल्लेख करणाऱ्या जॉर्जिया मेलोनी यांनी डाव्या विचारसरणीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत ही टीका केली आहे. या दोन्ही बड्या नेत्यांबद्दल डाव्या विचारसरणीचे नेते दुहेरी मापदंड ठेवतात, असं म्हणत मेलोनी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये 'कन्झर्वेटीव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्स'च्या (सीपीएसी) कार्यक्रमामध्ये ऑनलाइन माध्यमातून सहभागी झालेल्या मेलोनी यांनी भाषणातून आपलं म्हणणं मांडलं. डाव्या विचारसरणीचे लोक मोदी आणि ट्रम्प सारख्या नेते 'लोकशाहीसाठी धोकादायक आहेत' असा टॅग लावतात. मात्र हे चुकीचं असल्याचं मेलोनी यांनी म्हणताना ट्रम्प आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांचं कौतुक केलं आहे.
इटलीच्या पंतप्रधानांनी डाव्या विचारसरणीचे लोक निराशेच्या गर्तेत अडकल्याची टीका केली आहे. ट्रम्प यांच्या उदयानंतर डाव्यांची ही निराशा आता उन्मादामध्ये रुपांतरीत झाली आहे, असं मेलोनी यांनी म्हटलंय. डाव्या विचारसरणीचे लोक ट्रम्प यांच्या विजयानंतर चिडचीड करु लागले आहेत. त्यांच्या चिडचीडीचं रुपांतर वेडेपणात झालं आहे. रुढीवादी नेते जिंकत असल्याची एकमेव खल त्यांना नसून हे रुढीवादी नेते आता जागतिक स्तरावर सहकार्याची भूमिका घेत असल्याची खंतही त्यांना आहे.
जेव्हा बिल क्लिंटन आणि टोनी ब्लेअर यांनी 90 च्या दशकामध्ये जागतिक स्तरावर डाव्या विचारसरणीचं उदारमतवादी जाळं तयार केलं तेव्हा त्यांना राजकीय नेते म्हणून ओळखलं गेलं. आज जेव्हा ट्रम्प, मेलोनी, मिल्ले किंवा मोदी असं बोलतात तेव्हा हे नेते लोकशाहीसाठी धोका आहेत, असं म्हटलं जातं. असा दुहेरी मापदंड का? मात्र आता आम्हाला याची सवय झाली आहे. याहून चांगली गोष्ट अशी की आता लोक यांच्यावर (डाव्या विचारसरणीच्या लोकांवर) विश्वास ठेवत नाहीत. आमच्यावर कितीही चिखलफेक केली तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. लोक आमच्यासाठी मतदान करतात, असा टोला मेलोनी यांनी लगावला.
मेलोनी यांनी ट्रम्प हे फारच सक्षम नेते असल्याचं म्हणत त्यांना पाठिंबा दिला आहे. "आमच्या विरोधकांची अशी अपेक्षा आहे की ट्रम्प आमच्यापासून दूर जातील. मात्र ते एक सक्षम आणि प्रभावी नेते असल्याची मला कल्पना असल्याने मी हे पैजेवर सांगते की जे लोक आमच्यातील विभाजनाची अपेक्षा करत आहेत ते नक्कीच निराश होतील," असंही मेलोनी म्हणाल्या.