रायगड: २१ व्या शतकात तुम्ही कोणताही पराक्रम करा... समाज परंपरा रूढी यांच्या विरूद्ध जाण्याचं साहस केलंत तर तुम्हाला ग्रामीण भागात माफी नाही. आमचं हे विधान घातक वाटत असेल तर एव्हरेस्टवीर राहुल येलंगेची व्यथा...
राहुल येलंगे... पोलादपूरमधला एक प्रथितयश व्यावसायिक.. राहुलने एव्हरेस्टही सर केलंय. २०१२ मध्ये त्याने हा पराक्रम केल्यावर त्याचं रायगडकरांनी कौतुक केलं. मात्र समाजाच्या कद्रूपणाची कमाल पुढेच आहे. एव्हरेस्टवीर असा अभिमानाने किताब लावणारा, आधुनिक शेतीचे प्रयोग गावात राहून करणा-या राहुलला आता गावाने चक्क वाळीत टाकलंय. कारण काय... तर राहुलची पत्नी पौर्णिमा ही परजातीतली आहे.. ती जीन्स पँट घालते..
पौर्णिमाने वकिलीचं शिक्षण घेतलंय. ती मुळची पुण्याची... एव्हरेस्टवीर राहुलसोबत संसार करण्याचं स्वप्न तिनं बाळगलं आणि ती गावात राहायला आली. गावात काहीतरी नवं करण्याच्या इर्षेनं हे कुटूंब प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय. गाव मात्र बदलायला तयार नाही... नवे प्रयोग गावाला मान्य नाहीत. पौर्णिमाचा पेहराव गावातल्या स्त्रियांना मान्य नाही. गावातल्या महिलांचा मानसिक त्रास तिला सहन करावा लागत आहे.
पोलादपूर तहसील कार्यालयात सामाजिक बहिष्कारासंदर्भात झालेल्या बैठकीत या प्रकरणाला वाचा फुटली. गावातल्या ३८ लोकांनी राहुल विरोधात सार्वजनिक कार्यात अडथळा आणतो अशी तक्रार केली. राहुल अजूनही शांत आहे. त्याने बहिष्काराविरोधात तक्रार नोंदवलेली नाही. आता गावकरी हात वर करत आहेत.
मंगळावरची स्वप्न पाहणाऱ्या भारतात जातीपाती, चालीरिती, पेहराव असल्या गोष्टींवरून भेदभाव सुरू आहेत. हे काळजीचं कारण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.