बिकट परिस्थितीवर मात करत नाशिकचा देविदास बनला 'साहेब'!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत साडेचार लाख विद्यार्थ्यांमधून नाशिकचा देविदास वनसे राज्यात प्रथम आला आहे. धुणीभांडी आणि शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबाच्या या मुलाने खडतर परीस्थितीवर मात करून तरूणासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता त्याने हे यश मिळवलंय. 

Updated: Mar 2, 2016, 11:00 PM IST
बिकट परिस्थितीवर मात करत नाशिकचा देविदास बनला 'साहेब'! title=
प्रातिनिधिक फोटो

योगेश खरे, नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत साडेचार लाख विद्यार्थ्यांमधून नाशिकचा देविदास वनसे राज्यात प्रथम आला आहे. धुणीभांडी आणि शेतमजुरी करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या कुटुंबाच्या या मुलाने खडतर परीस्थितीवर मात करून तरूणासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता त्याने हे यश मिळवलंय. 

शेतात काम करत करत तो आज विक्रीकर निरीक्षक झाला आहे. राज्यात उत्तीर्ण झालेल्या साडे चारशे विद्यार्थ्यांमधून तो पहिला आलाय.  खडतर परिस्थितीवर मात करून त्याने हे भव्य यश मिळवलंय. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द या गावात त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं. यानंतर नाशिकमध्ये बी फार्म करून त्याने एका कंपनीत नोकरी केली. नंतर मावसभावाच्या घरी राहून त्याने मेडिकल स्टोअरमध्ये महिनाभर नोकरी केली. मात्र, आणखी मोठे होण्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने स्पर्धा परीक्षा सहजच देऊन पाहिली. पहिल्या प्रयत्नात थोड्या मार्कांनी यश हुकलं... पण जिद्दीन त्याने अभ्यास सुरू ठेवला आणि दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं.

घरची परिस्थिती अतिशय गरीब... शेती तोकडी असल्याने वडीलांना शेतमजुरी करावी लागत होती. आईला इतर घरी धुणीभांडी करावी लागत होती. चार बहिणींची लग्न करता करता त्याला परिस्थितीची जाणीव झाली. अखेर शहरात मावसभावाच्या कुटुंबाने हात दिल्याने यश मिळाल्याचं देविदासची आई द्रौपदाबाई वनसे यांनी म्हटलंय. 

जिद्द, चिकाटी आणि महत्त्वाकांक्षेच्या यश नक्की मिळतं असं आवाहन देविदासने विद्यार्थ्यांना केलंय. अडचणींवर मात करीत देवीदास वनसे यांनी यशाला घातलेली गवसणी ही इतरांसाठी प्रेरणादायी आहे. यापुढे आयएएस करण्याची जिद्द देवीदासने उराशी बाळगली आहे... देविदासच्या वाटचालीला झी मीडियाच्या शुभेच्छा...