मुंबई : झी मराठीने २०१६ या वर्षात नात्यांचे अनोखे बंध जोडले. नवी नाती जपत रसिकांशी आपली घट्ट नाळ जोडली. या वर्षात नात्यांचे अनेकविध रंग रसिकांनी झी मराठीवर अनुभवले. हे वर्ष संपताना या हळूवार नात्यांचाच रंग अधिक गडद होईल. नव्या नात्यांच्या पुसट रेषा ठळक होतील. नात्यांची ही विविधरंगी उधळण आणि हा अनोखा जल्लोष पाहण्याची संधी रसिकांना मिळेल. नाताळच्या सांताक्लॉजबरोबरच अभूतपूर्व भेटींचा नजराणा तीन लोकप्रिय मालिकांच्या प्रत्येकी एक तासाच्या विशेष भागांमधून येत्या रविवारी २५ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता झी मराठीवर रसिकांना मिळणार आहे.
'तुझ्यात जीव रंगला'मध्ये राणा आणि अंजली यांच्यातील प्रेमकथा फुलू लागली आहे. शरीराने आडदांड असलेला कुस्तीवीर पण स्वभावाने लाजराबुजरा असलेला राणा आपल्या आयुष्यात काहीतरी आगळंवेगळं घडलंय याची चाहूल लागलेला. अंजलीने त्याला त्याची जीवनसाथी शोधून देण्याचे आश्वासन दिलंय. पण ती जीवनसाथी नेमकी कोण याचा उलगडा येत्या रविवारीच राणाला होईल. आणि हा उलगडा होणार आहे हुरडा पार्टीमध्ये. राणाच्या शेतावर गायकवाड कुटुंबिय हुरडा पार्टीचा आनंद घेणार आहेत आणि त्यात या कुटुंबासोबतच गावकरीही सहभागी होणार आहेत. याशिवाय अंजलीसुद्धा या पार्टीसाठी विशेष निमंत्रीत असणार आहे. 'तुझ्यात जीव रंगला'चा हा रंगतदार महाएपिसोड येत्या रविवारी सायंकाळी ७ वा. प्रेक्षकांना बघता येणार आहे.
'खुलता कळी खुलेना'मध्ये विक्रांत आणि मानसी यांची मैत्री एकीकडे दृढ होते तर दुसरीकडे मोनिकासोबतचं नातं कायमचं तोडून त्या तणावातून मुक्त होण्याचा निर्णय विक्रांतने घेतला आहे. समजुतदारपणे घटस्फोट घेण्याची मागणी त्याने मोनिकाकडे केली आहे. विक्रांतची ही मागणी मोनिकाने सध्या तरी मान्य केलीय पण त्यासाठी काही काळ त्याच्याच घरी राहण्याची अट तिने त्याला घातली आहे. दरम्यान एका मेडीकल कॉन्फरन्ससाठी मानसी विक्रांतसोबत जाणार आहे. घरात चाललेल्या तणावाच्या वातावरणातून बाहेर येऊन थोडा मोकळा वेळ मिळेल या उद्देशाने विक्रांतसुद्धा तिकडे जाण्यास तयार होतो. याच कॉन्फरन्समध्ये या दोघांच्या अव्यक्त भावना मोकळ्या होतील आणि त्यांच्या नात्याला सापडेल एक नवी दिशा. 'खुलता कळी खुलेना'चा हा विशेष भाग प्रेक्षकांना बघता येईल रात्री ८ वा.
'माझ्या नव-याची बायको'मध्ये गुरुनाथच्या आईवडिलांना प्रभावित करण्यासाठी शनाया अनेक युक्त्या आखतेय पण शनायाचा प्रत्येक डाव राधिका उधळून लावतेय. ख्रिसमसनिमित्त गुरुच्या कॉलनीत विशेष कार्यक्रम आखला जातो त्यात विविध स्पर्धांबरोबरच 'वुमन ऑफ द इयर' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत शनायासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभी ठाकते राधिका. एवढंच नाही तर ती शनायाला आव्हान सुद्धा देते की या स्पर्धेत ज्या कुणाची हार होईल तिने ही सोसायटी सोडून जायचं. यामुळेच शनाया ही स्पर्धा येनकेनप्रकरेण जिंकण्यासाठी सज्ज झालीय. ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेचा हा महाएपिसोड येत्या रविवारी रात्री ९ वा. बघायला मिळेल.
प्रेमाची बहारदार रंगत आणि भावनांचे हिंदोळे यांच्या साथीने नात्यांचा हा विविधरंगी जल्लोष २५ डिसेंबरला सायंकाळी सात ते दहा वाजता झी मराठीवर अनुभवता येतील.