नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड आणि १९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आज 'डी-कंपनी'तून रिटायर होतोय.
पाकिस्तानात कराचीमध्ये तो आपला ६० वा वाढदिवस आज सेलिब्रेट करतोय. याचवेळी आपली निवृत्ती जाहीर करत डी - कंपनीचा नवा म्होरक्याची निवड होणार असल्याचं समजतंय. यासाठी दाऊदचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकील आणि दाऊदचा छोटा भाऊ अनिस इब्राहिम यांच्या नावांत स्पर्धा असल्याचंही समजतंय.
सेलिब्रेशनची जोरदार तयारी...
भारताची गुप्तहेर संघटना सध्या कराचीवर लक्ष ठेऊन आहे. भारताचा सर्वात मोठा वैरी दाऊदचा आज ६० वा वाढदिवस आहे. पण नेहमीप्रमाणेच पकडेल जाण्याच्या किंवा मारले जाण्याच्या भीतीने तो त्याचा वाढदिवस साध्या पद्धतीनंच साजरा करणार आहे.
सध्याच्या भारत सरकारविषयीच्या दडपणाने दाऊद त्याचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करतोय. या सरकारच्या भीतीपोटी या पार्टीसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात असणारय. दाऊद पार्टी हॉलमध्ये एका बुलेटप्रुफ गाडीनं येणार आहे.
पार्टी एका इनडोअर हॉलमध्ये असेल. या पार्टीला येणाऱ्या पाहुण्याना निमंत्रण पत्रिका आणणे सक्तीचे आहे. हॉटेलमध्ये आल्यावर या पत्रिकेवरचे बारकोड अपडेट केस्यानंतरच हॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव कुठलंही गिफ्ट न आणण्याचीही विनंतीही पाहुण्यांना करण्यात आलीय. पार्टीमधील दाऊदचा एकही फोटो लिक होऊ नये यासाठी पाहुण्यांना हॉलमध्ये मोबाईल आणण्यास मनाई आहे. या पार्टीसाठी सुमारे १०० पाहुणे मंडळी येणार आहेत.
कराचीमधल्या एअरपोर्टजवळच्या एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये त्याचा साठावा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे. यावेळी त्याची पत्नी, मुली, जावई आणि काही जवळची मित्रमंडळी सहभागी होणार आहेत.
छोटा शकीलकडून तीन कोटींची रिव्हॉल्व्हर भेट
दाऊदचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोटा शकीलनं दाऊदसाठी एक गिफ्टही खरेदी केलंय. छोटा शकीलनं तीन कोटींची एक रिव्हॉल्वर त्याच्या बॉससाठी खरेदी केलीय. या रिव्हॉल्वरचं हँडल १८ कॅरेट सोन्यावर हिऱ्यांनी सजवलेलं आहे. तर ट्रिगर व्हाईट गोल्डचं आहे.
दरम्यान, बॉलीवूडमधील कुणालाही या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही.
'दाऊदचा ठिकाणा माहित नाही'
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा माहित नसल्याचं डॉन वृत्तपत्राचे सीईओ हामिद हारून यांनी म्हटलंय. याबाबत आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. तसंच दाऊद आफ्रिकन देशात असल्याचं वाटतं असंही त्यांनी सांगितलंय.