मुंबई : गेल्या वर्षी तुरुंगातून सुटका झाल्यावर आता पहिल्यांदाच आयसिसचा म्होरक्या दहशतवादी अबू बकर अल बगदादी याची पत्नी साजा अल दुलायमी हिने त्याच्याविषयी जाहीर वक्तव्य केलं आहे.
सीएनएन या वृत्तवाहिनीशी बोलताना तिने असा दावा केला आहे की बगदादी या रक्तापिपासू नव्हता. एका विद्यापीठात प्राध्यापक असणारा बगदादी खूप कुटुंबवत्सल माणूस होता.
'ते खूप श्रेष्ठ होते. आमच्या मुलांचे ते आदर्श वडील होते. तो ज्या पद्धतीने मुलांसोबत वागायचा... तो शिक्षक होता... तुम्हाला माहितीये शिक्षक कसे असतात. आपल्या आईसोबत कसे वागायचे यापेक्षाही आपल्या मुलांसोबत कसे वागायचे हे त्याला जास्त चांगले ठाऊक होते,' असं ती म्हणाली.
बगदादी याचं व्यक्तिमत्व संशयास्पद होतं असंही तिने म्हटलं आहे. त्यात साजा ही बगदादीची दुसरी पत्नी. म्हणूनच त्यांचा संवादही सामान्य नव्हता. दोन बायकांनी एकत्र राहणे, ही कठीण बाब असल्याचंही तिने नमूद केलंय.
बगदादीपासून गरोदर राहिल्यानंतर तिने बगदादीला सोडलं. 'मी त्याच्यासोबत खुश नव्हते,' असं तिने म्हटलंय. त्याने तिला मनवण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्नही केले. २००९ साली त्यांचे शेवटचे संभाषण झाले.
आता मात्र तिला 'बगदादीची पत्नी' या ओळखीची चीड आली आहे. तिच्या मुलीला परदेशात चांगले शिक्षण देण्याची तिची इच्छा आहे. मुलींच्या सुरक्षिततेची काळजीही तिला सतावते आहे. आता तिला एका युरोपीय राष्ट्रात 'स्वतंत्रपणे' राहण्याची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे.