चेन्नई : एआयएडीएमकेच्या सरचिटणीस आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार व्ही के शशिकला यांनी चेन्नई नजिक कुवाथूर इथे आज आपल्या पक्षाच्या आमदारांची भेट घेतली. मुख्यमंत्रीपदावरुन तामिळनाडू राज्यात पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली गेली.
कुवाथूर इथल्या गोल्डन बे रिसॉर्टमध्ये सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत पुढल्या रणनितीसंबंधी चर्चा करण्यात आली. आतापर्यंत आपण संयम बाळगला, मात्र उद्या आपण निदर्शन करणार असल्याचं शशिकला यांनी त्यानंतर सांगितली.
दरम्यान शशिकला यांनी राज्यपालांकडे भेटीची वेळ मागितली आहे. मात्र अजून पर्यंत राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून शशिकला यांना भेटीची वेळ देण्यात आलेली नाही. आपल्याकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ असून सरकार स्थापनेसाठी आपल्याला आमंत्रित केलं जावं असा दावा, शशिकला यांनी 9 फेब्रुवारीला केला होता. मात्र मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार आणि माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी शशिकला यांच्याविरोधात बंड पुकारलं.
आपल्याला सक्तीनं मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार करण्यात आल्याचा आरोप पनीरसेल्वम यांनी केल्यानंतर हा प्रश्न चिघळलाय. यावर राज्यपालांनी दोन्ही गटांची भूमिका ऐकून घेतली असून, आपला निर्णय मात्र अजून जाहीर केलेला नाही.