नवी दिल्ली: कार्यालयात रमत-गमत आणि उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच धडा शिकवला. मंत्रालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. जावडेकरांनी या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापून घेत त्यांना घरी परत पाठवलं.
प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतल्या कार्यालयात सोमवारी सकाळी 9 वाजता अचानक भेट दिली. त्यावेळी अनेक अधिकारी आणि कर्मचारी आलेलेच नव्हते. दिल्लीतील शास्त्री भवनातून त्यांच्या मंत्रालयाचं कामकाज चालतं. जावडेकरांनी कार्यालयातल्या पहिल्या मजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत पाहणी केली.
प्रकाश जावडेकरांकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाबरोबरच पर्यावरण मंत्रालयाचाही कारभार आहे. त्यामुळं ते सकाळी पर्यावरण मंत्रालयात बसतात आणि दुपारी शास्त्री भवनात येतात. पण सोमवारी सकाळी नऊ वाजताच ते शास्त्री भवनातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयात धडकले. त्यांनी विविध विभागातील माहितीचा आढावा घेण्याचं ठरवलं. मात्र फेरफटका मारल्यानंतर त्यांना मोजकेच कर्मचारी दिसले. जावडेकरांनी कार्यालयातल्या परिस्थितीचे फोटो घेतले.
कार्यालयीन वेळ होऊनही अनेक कर्मचारी आलेले नव्हते. त्यामुळं सगळ्या लेटलतीफ कर्मचाऱ्यांनी आपल्याला भेटावं अशी सूचना जावडेकरांनी केली. २५ ते ३० अशा गटा-गटानं जावडेकर किमान २०० कर्मचाऱ्यांना भेटले आणि त्यांची कानउघाडणी केली. पुन्हा उशिरा आल्याचं आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारावई करण्यात येईल, अशी नोटीसही जारी करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.