www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोशल वेबसाईटस् निष्काळजीपणे हाताळणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? असाल... तर सावधान! कारण, तुमच्या कमेंटस् आणि टीका-टिप्पणीमुळे दहशतवाद पसरवण्यास मदत तर होत नाही ना? यावर आता ‘नेत्रा’ची नजर राहणार आहे.
केंद्र सरकार आता लवकरच `नेत्रा` नावाची इंटरनेट पाळत यंत्रणा कार्यान्वित करीत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या यंत्रणेची अंतिम चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून एखाद्या दहशतवादी हल्ल्याचा कट शिजला जात असेल, तर याची कुणकुण सुरक्षेयंत्रणेपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. लवकरच ही यंत्रणा सर्व सुरक्षा यंत्रणांकडून वापरण्यात येणार आहे.
मेल, ब्लॉग, फोरमवरील लिखित संदेशाबरोबरच या यंत्रणेत स्काईप, जीटॉकसारख्या माध्यमातून होणारी संशयास्पद संभाषणेही टिपण्याची सुविधा असणार आहे.
`नेत्रा` ही यंत्रणा `सेंटर फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अॅण्ड रोबोटिक्स` व `संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ (डीआरडीओ) यांनी संयुक्तरीत्या विकसित केली आहे. या यंत्रणेची तांत्रिक माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. गुप्तहेर खाते आणि कॅबिनेट मंत्रालयाने याची चाचणी घेतली असून लवकरच ही यंत्रणा सर्व सुरक्षा संस्थांना देण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे अशा घातक संदेशांवर पाळत ठेवण्यात येईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.