www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप प्रकरणी दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. दोषी आरोपींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. चारही आरोपींना काल कोर्टानं दोषी ठरवलं. आज सकाळपासूनच कोर्टात दोन्ही वकिलांनी आपआपला युक्तीवाद मांडला. त्यानंतर कोर्टानं निर्णय शुक्रवारी होईल असं सांगितलं.
सुनावणीसाठी आज चारही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. अक्षय, पवन, विनय आणि मुकेश यांच्या शिक्षेबाबत युक्तीवाद पूर्ण झाला. सरकारी वकिल दयन कृष्णन यांनी आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली. गँगरेपच्या घटनेनंतर काही दिवसांनी तरुणीचा मृत्यू झाला होता. आपल्या युक्तीवादात सरकारी वकील म्हणाले, या चारही आरोपींनी जो अक्षम्य गुन्हा केलाय, त्यासाठी ते फाशीच्याच लायकीचे आहेत. तर दुसरीकडे आरोपींच्या वकिलांनी फाशीचा विरोध केला. कोर्टाच्या बाहेरच्या वातावरणामुळं सुनावणीवर परिणाम झालाय, असं आरोपीचे वकील म्हणाले.
१६ डिसेंबर २०१२ ला पॅरामेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये आरोपींनी सामूहिक बलात्कार केला होता. एवढंच नाही तर त्यांनी गंभीर इजा पोहोचवत तिला बसखाली फेकून दिलं होतं. या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेला होता.
अतिरिक्त सत्र न्यायाधिश योगेश यांनी काल म्हटलं की, आरोपींनी पीडित मुलीवर केलेला अत्याचार आणि दिलेल्या जखमा अतिशय गंभीर स्वरुपाच्या होत्या. त्यात १८ जखमा या अंतर्गत होत्या. पीडित तरुणीच्या शरीरात लोखंडी रॉड टाकणं म्हणजे तिला मारण्याचाच प्रयत्न केल्याचं कोर्टानं म्हटलं होतं.
गँगरेपमधील आरोपी असलेला पवन गुप्ताचं वय बघता त्याला फाशीची शिक्षा देवू नये, असं त्याच्या वकिलानं म्हटलंय. पवन गुप्ताचं वय १९ वर्ष आहे. त्याला सुधारण्याची एक संधी द्यावी, असं आरोपींच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं. त्याच्याहातून घडलेला गुन्हा हा पूर्वनियोजित नसून अचानक घडलेला होता. त्यामुळं त्याला जन्मठेप द्या फाशी नको, असा युक्तीवाद पवन गुप्ताच्या वकिलांनी केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.