www.24taas.com,नवी दिल्ली
भारतातील ईशान्य नागरीकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी आणि फूट पाडण्यासाठी पसरवले गेलेले एसएमएस आणि एमएमएस पाकिस्तानमधून पाठविण्यात आले, असे गृहसचिव आर. के. सिंग यांनी सांगितले.
हे एसएमएस, एमएमएस प्रसारित करणाऱया वेबसाईट ब्लॉक केल्या गेल्या आहेत आणि यासंदर्भात पाक सरकारकडे भारत निषेध नोंदवत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील दहशतवादी शक्तींनी भारताविरूद्ध पुकारलेले हे सायबर वॉर असल्याचे मानले जात आहे.
आसाममधल्या घटनांनंतर केवळ अफवांमुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली. त्यामुळे बल्क एसएमएस आणि एमएमएसवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय आहे. सोशल नेटवर्किंगचा दुरुपयोग या निमित्तानं पुन्हा समोर आला आहे.
आसाममधल्या हिंसाचारानंतर एसएमएस, एमएमएस आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अफवा पसरवल्या गेल्या. आणि त्यामुळेच ईशान्य भारतीयांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. परिणामी ईशान्य भारतीयांनी आसामचा रस्ता धरला. आता सरकारनंही याबाबत कठोर निर्णय घेत बल्क एसएमएस आणि एमएमएसवर बंदी घातलीय. सोशल नेटवर्किंगचा गैरवापर करणा-यांवर कठोर कारवाईचा इशारा राज्य सरकारनं दिलाय.
वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत रोज १५ ते २० कोटी एसएमएस पाठवले जातात. त्यातले बहुतांशी प्रमोशन आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतात. बल्क एसएमएस टाळण्यासाठी ग्राहक `डू नॉट डिस्टर्ब` नोंदणी करू शकतो. अर्थात बँकिंग, शिक्षण, आरोग्य असे आवश्यक एसएमएस वगळता अन्य एसएमएस टाळण्याचा पर्यायही ग्राहकांकडे आहे. पण याची योग्य माहिती नसल्यानं समाजकंटक फायदा घेऊन उपद्रवी बल्क एसएमएस पाठवतात. पण बंदी घालण्यापेक्षा एसएमएस पाठवूनच लोकांमधील गैरसमज दूर करायला हवेत, असं ही सेवा पुरवणा-यांना वाटतं.
यापूर्वी अयोध्या प्रकरणी कोर्टाच्या निकालानंतर बल्क एसएमएसवर सरकारनं बंदी घातली होती. आता आसाम हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या अफवांच्या दहशतीमुळे सरकारला पुन्हा बल्क एसएमएसवर बंदी घालावी लागलीय. बंदी हा कायम स्वरुपी तोडगा होऊ शकत नसल्यानं अभ्यास करून गैरवापर टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असं मतही व्यक्त केलं जातंय.