नवी दिल्ली : अमेरिकेच्या सॅन जोसे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबाला आपल्या निशाण्यावर घेतल्यानं काँग्रेसनं सोमवारी याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मोदी हे एक आत्ममग्न व्यक्ती आहेत, जे कधीही इतरांबद्दल विचार करत नाहीत, असं काँग्रेसनं म्हटलंय.
'केवळ मी, माझं आणि माझ्याबद्दल एव्हढंच पंतप्रधान विचार करतात. जगातील दुसरा कोणताही नेता स्वत:ची या पद्धतीनं छबी समोर मांडताना तुम्ही पाहिलाय?' असं काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटलंय.
अधिक वाचा - फेसबुक प्रमुखाने घेतलेल्या मुलाखतीत मोदी रडले
शर्मा यांनी यावेळी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाबद्दलही प्रश्न निर्माण केलेत. यावेळी, होणाऱ्या सामुदायिक रॅलींच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.
फेसबुकच्या टाऊनहॉलमध्ये आपल्या आईविषयी बोलताना भावूक झालेल्या मोदींवरही शर्मा यांनी निशाना साधलाय. 'मोदींच्या म्हणण्यानुसार, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आईला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासावी लागली... हे योग्य नाही. पंतप्रधानांनी आपल्या आईबद्दल केलेल्या या वक्तव्यांची आम्ही चौकशी केलीय. पण, असं काहीही नाहीय' असं शर्मा यांनी म्हटलंय.
आपलं म्हणणं स्पष्ट करताना, 'हे खरंच आहे की मोदी यांचं कुटुंब फार श्रीमंत नव्हतं पण, मोदींचं कुटुंब इतकं गरीबही नव्हतं की उपजिविकेसाठी त्यांच्या आईला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासावी लागावीत' असंही शर्मा म्हणतायत.
'मोदींचे वडील कॅन्टीन चालवत होते. मोदी चहा कधी विकत होते? पंतप्रधान म्हणतात त्यांची आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी साफ करत होती. हे खोटं आहे. पंतप्रधान आपल्या आईचा अपमान करत आहेत' असं म्हणत काँग्रेसनं मोदींवर जोरदार हल्ला केलाय.
फेसबुकच्या टाऊनहॉलमध्ये आपल्या आईविषयी बोलताना मोदींना रडूही कोसळलं होतं. आपल्या जीवनात आपल्या आईची भूमिका खूप मोठी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. आपल्या आईनं दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी घासलीयत तसंच पाणीही भरण्याचं काम केलंय, असं यावेळी मोदींनी म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.