बहुपयोगी दह्याचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील!

रंगानं पांढरं, घट्ट, सॉफ्ट, क्रिमी आणि चवीला आंबट-गोड... म्हणजे अर्थातच दही! अगदी सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ तुमच्या शरीरासाठी मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं फायदेशीर ठरतो. 

Updated: Sep 29, 2015, 01:14 PM IST
बहुपयोगी दह्याचे हे फायदे कदाचित तुम्हाला माहितही नसतील! title=

नवी दिल्ली : रंगानं पांढरं, घट्ट, सॉफ्ट, क्रिमी आणि चवीला आंबट-गोड... म्हणजे अर्थातच दही! अगदी सहज उपलब्ध होणारा हा पदार्थ तुमच्या शरीरासाठी मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं फायदेशीर ठरतो. 

आपल्या शरीरासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी दही अतिशय महत्त्वाचं काम करतं. त्यामुळेच, तुमच्या दररोजच्या आहारात दह्याचा वापर असणं म्हणजेच हेल्दी डाएटच... पाहुयात, कसे मिळतात या दह्याचे तुमच्या शरीराला फायदे... 

मसालेदार पदार्थांची चव चाखल्यानंतर...
बहुतेकदा तिखट किंवा मसाल्याचे पदार्थ जास्त खाल्ल्यानं ढेकर येण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी अपचनाचा त्रास उद्भवतो. या त्रासावर उपाय म्हणून दही तु्म्हाला उपयोगी ठरतं. 

पचनशक्ती वाढवण्यासाठी...
दह्यात विटॅमिन बी१२ आणि मायक्रोऑर्गनिझम आढळतात. त्यामुळे पचनशक्ती वाढवण्यासाठी दही उपयुक्त ठरतं. तुम्हाला जर तुमची पचनप्रक्रिया सुरळीत ठेवायची असेल तर दह्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

अॅसिडिटीपासून सुटका
दुपारच्या ३.०० वाजता किंवा रात्री १२ वाजता... किंवा अशाच कोणत्याही अनियमित वेळी तुमचं जेवण झालं असेल तर तुम्हाला दह्याचं महत्त्व लगेचच लक्षात येईल... दोन जेवणांमध्ये बरचं अंतर निर्माण झाल्यानं शरीरात निर्माण झालेली हीट कमी करण्यात दह्याचा उपयोग होतो. 

वजन घटवण्यासाठी 
तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल किंवा तुमच्या शरीरावर दिसणारी चरबी घटवायची असेल तर तुमच्यासाठी दही हे योग्य डाएट आहे. दह्यातून मिळणारं कॅल्शिअम तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा चरबी घटवण्यासाठी फायदेशीर ठरतं... आणि त्यामुळे तुमचं वजनही कमी होण्यात मदत होते. 

हाडांना मजबुती देण्यासाठी
दह्यामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी आढळतं... ही जीवनसत्त्व तुमच्या हाडांना मजबुती प्रदान करण्याकरता फायदेशीर ठरतात. 

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी
दह्यामध्ये पोटॅशिअमही आढळतं. हे पोटॅशिअम तुमचा वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. आजारांशी लढणाऱ्या तुमच्या रक्तातील पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम दही करतं.

त्वचेसाठी उपयुक्त
दह्याचा तुमच्या शरीराला केवळ अंतर्गत फायदा होतो असंही नाही... कारण हेच दही चेहऱ्याला लावून तुम्ही तुमचं तेज उजळून काढू शकता. दह्यामध्ये असणारं लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील डेड सेल काढून टाकण्यासाठी उपयोगी ठरतं. त्यामुळे तुम्ही 'फेस पॅक' म्हणून दह्याचा वापर करू शकता.

मग काय, दररोजच्या आहारात तुम्हीही दह्याचा वापर सुरु करताय ना!  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.