www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आपल्या हास्यानं अनेकांची मनं जिंकणारी आणि दमदार अभिनयानं बॉलिवूडमध्ये छाप पाडणाऱ्या अभिनेत्री गुल पनागनं आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तिनं आम आदमी पक्षात प्रवेश केलाय.
एवढंच नव्हे तर गुल पनागला चंदीगड मतदारसंघातून तिला लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी माहिती सूत्रांनी दिली. सौदर्य स्पर्धेत मिस इंडियाचा मुकूट पटकावणाऱ्या गुल पनागनं १० वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. हॅलो, डोर, धूप, मनोरमा सिक्स फिट अंडर अशा चित्रपटांमधून गुलपनागनं तिच्या अभिनयाची छाप पाडली. मात्र बॉलिवूडमध्ये तिला फारसे यश मिळाले नाही.
आता गुल पनागनं राजकारणात उडी मारली आहे. गुरुवारी गुल पनागनं आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. `माझं लहानपण चंदीगडमध्ये गेलंय. `आप`च्या विचारधारांचा मी आदर करते` असं गुल पनागनं सांगितलं. आपनं गुल पनागला चंदीगडमधून उमेदवारी द्यायची तयारी सुरु केली आहे.
यापूर्वी आपनं या मतदार संघातून दिवंसगत अभिनेते जसपाल भट्टी यांची पत्नी सविता भट्टी यांना उमेदवारी दिली होती. मात्र या मतदार संघातील आप नेत्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यानं भट्टी यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आता भट्टींऐवजी गुल पनागला चंदीगडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा घाट आपने घातला आहे. त्यांची ही खेळी कितपत यशस्वी ठरते हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल. .
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.