रेल्वेचे सावत्र अपत्य 'हार्बर रेल्वे'

१६ मार्चला रेल्वे बजेट सादर होणार असल्याने सर्व मुंबईकराचं त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. समस्यांचा रेल्वे मार्ग म्हणून हार्बर रेल्वे मार्गाची ओळख आहे. रेल्वेचे सावत्र अपत्य असल्यासारखी वागणूक हार्बर रेल्वेला आणि पर्यायाने तिथल्या रेल्वे प्रवाशांना मिळत असल्याची टीका प्रवासी संघटना करत आल्या आहेत.

Updated: Mar 11, 2012, 06:41 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई

 

१६ मार्चला रेल्वे बजेट सादर होणार असल्याने सर्व मुंबईकराचं त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. समस्यांचा रेल्वे मार्ग म्हणून हार्बर रेल्वे मार्गाची ओळख आहे. रेल्वेचे सावत्र अपत्य असल्यासारखी वागणूक हार्बर रेल्वेला आणि पर्यायाने तिथल्या रेल्वे प्रवाशांना मिळत असल्याची टीका प्रवासी संघटना करत आल्या आहेत. रेल्वे अर्थसंकल्पाच्या निमित्ताने काही सुधारणा होतील अशी आशा प्रवासी व्यक्त करत आहेत.

 

विमानतळाचे वेध लागलेल्या नवी मुंबईमध्ये अधिकाधिक लोकवस्तीची भर पडत चालली आहे. त्यामुळे हार्बर रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचा पाढाही त्याच गतीनं वाढत चालला आहे. रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढत असल्यानं या मार्गावर १२ डब्यांच्या लोकल गाड्या सुरू होण्याची नितांत गरज आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गावर जलद लोकल गाड्या किंवा त्यासाठीच्या वेगळ्या मार्गाचे काम सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

 

ऐनगर्दीच्या वेळी कुर्ल्याहून लोकल गाड्या सोडल्या तर गर्दीचा बराच मोठा भार कमी  होऊ शकतो. तसंच पनवेल - अंधेरी लोकल सेवा वाढवण्याचीही मागणी गेली अनेक वर्षे जोर धरते आहे. त्याचप्रमाणे हार्बरच्या अनेक रेल्वे स्थानकांवर मुलभूत सोयी सुविधांची बोंब आहे. त्यामुळे निदान या रेल्वे अर्थसंकल्पात तरी हार्बर रेल्वेमार्गाकडे लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी करत आहेत.

 

हार्बर रेल्वे मार्गाची आणखी एक ओळख म्हणजे मेगा ब्लॉक. मेगा ब्लॉकसाठी दर रविवारी चक्क अर्धा रेल्वेमार्ग बंद ठेवला जातो. तरीही अनेकदा या मार्गावर तांत्रिक समस्या उभ्या राहतातच. आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याचा नाहक त्रास प्रवाशांना होतांना दिसतो. त्यामुळे मेगा ब्लॉकचे आणि हार्बरच्या समस्यांचे दुष्टचक्र थांबणार तरी कधी असा सवाल रेल्वे प्रवासी करत आहेत.